प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढवू : प्राथ. शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर

Edited by: देवयानी वरसकर
Published on: March 21, 2024 05:18 AM
views 89  views

सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक शाळेत विद्यार्थी आले  तर पटसंख्या वाढेल, शाळा टिकतील, व शिक्षकही टिकतील यासाठी आपला गुणवत्तेवर  व दर्जेदार शिक्षणावर भर राहील. प्रत्येक विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे.  जिल्ह्यातील वाढत्या पटाच्या शाळा  व कमी पटाच्या शाळा यांचा अभ्यास करु व गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा या जिल्ह्यात चांगला प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी बुधवारी दिली.

सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्याने बुधवारी या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आपण प्राथमिक शिक्षक होतो. एमपीएससी परीक्षा पासून  आपण या पदापर्यंत पोहोचलो. यापूर्वी आपण तेरा वर्षे गटशिक्षणाधिकारी म्हणून कागल तालुक्यात काम केले आहे. या जिल्ह्यात आपली बढतीने बदली झाली आहे.  त्या तालुक्यातही  गुणवत्ता व शिष्यवृत्ती याबाबतचे चांगले काम केले आहे. कागल तालुका शिष्यवृत्ती मध्ये राज्यात प्रथम स्थानी आणला आहे.  या जिल्ह्यातही   वाढत्या पटसावसंख्येच्या शाळा व कमी पटसंख्या झालेल्या शाळा शोधून  पटसंख्या वाढविण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपला प्रयत्न राहील. विविध शिक्षक संघटना, प्रशासन यांच्याशी चर्चा करून चांगले निर्णय घेऊ व या जिल्ह्यात आदर्श शाळा कशा निर्माण होतील याचाही प्रयत्न करू असे ते म्हणाले.

 आपल्या राज्यातील शैक्षणिक विकासाबाबत आपली दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर आणखी तीन पुस्तके  प्रकाशित होतील. 'शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा' हे आपले पहिले पुस्तक प्रकाशित झाले. तर कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीत शैक्षणिक विकासावर प्रकाशझोत टाकणारे व ऑनलाईन पद्धतीतील फायदे तोटे यावर चिंतन करणारे  "ऑनलाइन शिक्षण पद्धती"  हे पुस्तक प्रकाशित झाले आहे या पुस्तकाची तिसरी आवृत्ती ही आता प्रकाशित होत आहे. याबद्दलही त्यांनी माहिती दिली. 

        गुणवत्ता व  शासनाचे शैक्षणिक धोरण प्राथमिक शाळांमधील कमी होणारी विद्यार्थी पटसंख्या  या सर्वांचा विचार करून  सध्या या जिल्ह्यात  वाढलेल्या पटसंख्येच्या शाळांचाही अभ्यास केला जाईल  व कमी शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करतानाच  सर्व शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी पावले उचलली जातील असे  शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर  म्हणाले.