अमेरिकन महिला प्रकरण | पोलीस निरीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

Edited by: विनायक गांवस
Published on: July 29, 2024 13:50 PM
views 112  views

सावंतवाडी : सोनुर्ली - रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत सापडलेल्या अमेरिकन महिला ललिता कायी कुमार एस हिला अधिक उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात रविवारी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलीस तपासात अनेक गोष्टीचा उलगडा झाला असून तिच्याकडे सापडलेल्या मोबाईल व टॅब माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून तपास केला जात आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. 

या प्रकरणात अमेरिकन दुतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण व बांदा पोलीस पथके गोवा व तामिळनाडू येथे रवाना करण्यात आलीत. मडूरे रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये काहीही माहिती न मिळाल्याने प्रकरणाची संदिग्धता वाढली आहे. शनिवारी दुपारी तामिळनाडू येथील व मुळ अमेरिका येथील महिला रोणापाल जंगलात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत गुराख्यांना आढळली. सावंतवाडी व बांदा पोलिसांनी या महिलेला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्ते यांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गेले काही दिवस ती उपाशी असल्याने बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.

सुरुवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक व चुकीची औषधे दिली. तसेच याठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याची माहिती दिली. अन्न न मिळाल्याने ती विदेशी महिला अशक्त बनली होती. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी सायंकाळी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. रविवारी तिची प्रकृती अधिक ढासळल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला अधिक उपचारासाठी गोव्यात हलविण्याचा सल्ला पोलीस प्रशासनाला दिला. त्यानुसार तिला लागलीच पोलीस बंदोबस्तात गोवा बांबोळी मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.

जंगलात सापडून आलेली अमेरिकन महिला ही उच्च शिक्षित असून ती योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर व योग शिक्षक होती. मात्र ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील जंगलात कशी पोहोचली याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. जंगलात सापडलेली महिला ही अमेरिकन नागरिक असल्याने या घटनेची अमेरिकन दुतावासाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात भारतीय सरकारशी संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी जलदगतीने करण्याची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेण्यात आल्याने पोलिसांवर तपासाचा दबाव वाढला आहे.