
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येते अशा महिलांना नागरी पतसंस्था नोंदवावयाची असेल त्यांनी जिल्हा कार्यक्षेत्राच्या संस्थेसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग तसेच तालुका किंवा त्यापेक्षा कमी कार्यक्षेत्रासाठी संबंधित तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ सोपान शिंदे यांनी केले आहे.
महिला व बालविकास विभागाच्यावतीने महिलांसाठी लाडके बहीण योजना राबविली जाते. या योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची गाव, तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असलेली नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येईल. अशा प्रकारची संस्था स्थापन करण्यासाठी महिला सहकारी पतसंस्थेचे सभासद होण्यासाठी महिला व बालविकास विभाग यांनी प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी म्हणून श्री सुनील मरभळ, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कुडाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून देवगड तालुक्यासाठी प्रेमानंद जाधव ,वैभववाडी तालुक्यासाठी अभिनय विचारे, कणकवली तालुक्यासाठी श्रीमती सुनिता भोगले, मालवण तालुका अजय हिर्लेकर, वेंगुर्ला तालुका राजन चौगुले, कुडाळ तालुक्यासाठी तुषार राणे, सावंतवाडी तालुका राजन आरावदेकर, दोडामार्ग तालुका पल्लवी पै, यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यासाठी गाव कार्यक्षेत्रासाठी २५० सभासद संख्या तर १ लाख ५० हजार भाग भांडवल, नगरपालिका कार्यक्षेत्रासाठी ५०० सभासद संख्या तर ५ लाख भाग भांडवल, तालुका कार्यक्षेत्रासाठी ५०० सभासद तर ५ लाख भागभांडवल, जिल्हा कार्यक्षेत्रासाठी १५०० सभासद संख्या तर १० लाख भाग भांडवल रुपये असणे आवश्यक आहे. तरी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची नागरी पतसंस्था नोंदवायची असेल त्यांनी जिल्हा कार्यक्षेत्राच्या संस्थेसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग, तालुका किंवा त्यापेक्षा कमी कार्यक्षेत्र संस्थेसाठी संबंधित तालुका सहाय्यक निबंध यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ सोपान शिंदे यांनी केले आहे.