
वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा येथे सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नळपाणी योजनेवर परिणाम होत असून वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ग्रामपंचायत शिरोडा सरपंच, उपसरपंच सहित सदस्यांनी वेंगुर्ला वीज वितरण उपपकार्यकारी अभियंता यांचे लक्ष वेधले.
शिरोडा गावाची नळपाणी योजना ही गुळदुवे गावातून चालू असून वादळी वारा पाऊस यामुळे सतत वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असतात. तसेच तेथील वायरमन यांची अचानक बदली झाल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडथळा येऊ लागला. या समस्येवर चर्चा करण्यासाठी आणि याबाबत निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत शिरोडा यांनी महावितरण उपविभागीय कार्यालय वेंगुर्ला येथे भेट देण्यात आली. विजेबाबत अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत मार्फत अनेक मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिरोडा सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर,प्रथमेश परब,पांडुरंग नाईक,राजन धानजी,रश्मी डिचोलकर,नंदिनी धानजी, अनिस्का गोडकर, शीतल नाईक,अर्चना नाईक, हेतल गावडे, जगन बांदेकर, सुधीर नार्वेकर उपस्थित होते.