
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सिंधुदुर्ग दौरा पार पडला. या दौऱ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या समस्या मांडल्या. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने दोडामार्ग तालुक्याची एक गंभीर समस्या ठळकपणे समोर आणली.
धुरी यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून दोडामार्ग तहसीलदार पद रिक्त आहे, आणि त्या जागेवर केवळ नायब तहसीलदारांकडूनच तालुक्याचे प्रशासन हाकले जात आहे. यामुळे महसूल कामकाजात विलंब होतोय, तसेच नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, दाखले, जमीन नोंदी, तातडीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिस्थितीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोडामार्गला तात्काळ तहसीलदार नेमण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. मंत्र्यांच्या या आश्वासनाने तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी यावेळी सांगितले की, “दोडामार्ग तालुक्याचे महसूल प्रशासन अनेक महिन्यांपासून अपूर्ण क्षमतेने चालू आहे. आम्ही हा प्रश्न सातत्याने मांडत होतो. महसूल मंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला, ही स्वागतार्ह बाब आहे.”
दोडामार्ग तहसीलदार नियुक्तीचा निर्णय अमलात आल्यानंतर तालुक्यातील महसूल विभागाचे कामकाज गतीमान होण्यास मदत होईल, तसेच शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामकाजातील अडथळे दूर होण्याची अपेक्षा आहे.