माझे शहर माझी जबाबदारी

तिकीट मिळालं नाही याची चिंता नाही : अन्नपूर्णा कोरगावकर
Edited by: विनायक गांवस
Published on: November 20, 2025 18:45 PM
views 195  views

सावंतवाडी : नगराध्यक्षपदासाठी मी अपक्ष म्हणून उभी आहे. माझे शहर माझी जबाबदारी, एकच ध्यास सावंतवाडीचा विकास हा माझा नारा आहे. तिकीट मिळालं नाही याची चिंता नाही. माझे मतदार मला आशीर्वाद देतील असा विश्वास नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी उपनगराध्यक्षा सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

सौ. कोरगावकर म्हणाल्या, युवक, महिला तसेच शहरासाठी मला काम करायचं आहे. हजारो मुलं शिक्षण घेऊन रोजगारासाठी परजिल्ह्यात, परराज्यात,  विदेशात जातात. मी स्वतः रोजगार देण्यासाठी प्रयत्न केलेत. कृषी सेवा केंद्र, अन्नपूर्णा टेक सोर्स आयटी कंपनीच्या द्वारे १२० हून अधिक तरूणांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यापुढे १२ हजार मुलांना रोजगार द्यावा हा माझा हेतू आहे. स्कील डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्याचा माझा मानस आहे. युवक आणि महिला माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असे मत व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या, अंडरग्राऊंड वीज वाहिनी, बाजारपेठ सुधारणा, पाणी प्रश्न तसेच विकासाचा चांगला उद्देश ठेवून मी मैदानात उतरले आहे. सर्वपक्षीय जनतेचा मला पाठिंबा आहे. मागे अपक्ष लढून भाजपला पाठिंबा दिला होता. आताही लढणार आणि विजय मिळवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भरघोस विकास निधी सावंतवाडीत आणण्याचा मानस माझा आहे. कामाचा अनुभव मला आहे. झालेला अन्याय विसरायचा हे माझ्यावरचे संस्कार आहेत. ९ वर्ष मी पक्षात कार्यरत आहे‌. मागच्या टर्मला ऑफर असतानाही मी पक्षासोबत राहीले, भाजपला पाठिंबा दिला. जनता माझ्यावर प्रेम करते. जनतेची मी सेवक असणार आहे. १३ वर्ष २ रूग्णवाहीकांच्या माध्यमातून मोफत सेवा देत आहोत. गोव्यात जाणारे रूग्ण चिंताजनक आहेत. त्यादृष्टीने चांगलं रुग्णालय व्हावं यासाठी माझा पुढाकार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, श्रीरंग आचार्य, व्यंकटेश शेट, विनिता नाटेकर आदी कुटुंबिय उपस्थित होते.