
कणकवली : कत्तलीसाठी गुरांची बेकायदेशिर वाहतूक करणार्या तीन टेम्पोंना फोंडाघाट चेकपोस्ट येथे सोमवारी पहाटे ५.३० वाजता सुमारास पोलिसांनी रोखले. त्या टेम्पोमधील १८ जनावरांसह तीनही टेम्पो ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी टेम्पो चालक मयूर आप्पासाब लखन्नावर (28, रा.निपाणी- सिद्धनाळ), क्लिनर नीलेश भिमराव काबंळे(29, रा.निपाणी- सिद्धनाळ) टेम्पोचालक वासिम गुलाब सोलापुरे(28, रा.निपाणी- भिमनगर), किशन सुरेश रसाळ (27, रा.निपाणी- भिमनगर), टेम्पोचालक आसिफ महम्मद ईसाकसिराज (35, रा.कोल्हापूर- आजरा), क्लिनर अरमान सलिम दरवाजकर (25, रा.कोल्हापूर-आजरा) यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 च्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद पोलिस नाईक दिगंबर सुभाष घाडीगावकर यांनी कणकवली पोलिस स्थानकात दिली आहे. दिगंबर घाडीगावकर हे फोंडाघाट चेकपोस्टवर डयुटी करत असताना फोंडाघाट बाजारपेठेतील काही युवक तीन बोलेरो पिकअप टेम्पो फोंडाघाट चेकपोस्टवर घेवून आले. सदर वाहनांमध्ये जनावरे असून ती कत्तलीसाठी जात असल्याचे त्यांनी चेकपोस्टवरील पोलिसांना सांगितले. चेकपोस्टवरील पोलिसांनी याबाबतची माहिती कणकवलीचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांना दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, हवालदार उत्तम वंजारे, कॉन्स्टेबल श्री. माने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बोलेरो पिकअप गाडांच्या हौद्यांमध्ये दाटीवाटीने गुरे बांधलेली होती. या गुरांना चार्या-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता टेम्पोवर ताडपत्री बांधलेली होती. टेम्पोचालकांची चौकशी केली असता सदर गुरे आपण कत्तल करण्यासाठी निपाणी-बेळगाव येथे नेत असल्याचे सांगितले. पोलिसानी त्यांच्याकडे परवाना विचारला असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी जनावरांना अवैद्यरित्या बिगर परवाना कत्तलीसाठी नेत असल्याच्या आरोपाखाली वरील सहा जणांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 तसेच मोटर वाहन अधिनियम 1988 या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.