कणकवलीत अवैध धंद्यांना ऊत !

नूतन पोलीस निरीक्षक काय करणार कारवाई ?
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 24, 2024 05:26 AM
views 399  views

कणकवली : जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असणाऱ्या कणकवली तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू वाहतूक मटका, जुगार, ऑनलाइन जुगार, गुटखा याच्या सह आता गांजा विक्री देखील काही प्रमाणात होत असल्याने  नूतन पोलीस निरीक्षक तडवी यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

गेल्या वर्षभरात कणकवली पोलीस निरीक्षक पदी येणारे अधिकारी काही महिन्यातच बदली होऊन जायचे त्यामुळे अवैध धंदेवाल्यांना पोलिसांची भीती राहिली नसल्याने खुलेआम  हे अवैध धंदे सुरू आहेत. प्रत्येक टपरीवर मटका खेळला जातो. तसेच गुटखा देखील विकला जात असल्याने यामध्ये युवा पिढी त्याच्या आहारी गेली आहे. ऑनलाइन जुगार देखील तशाच पद्धतीने सुरू असल्याने काही जणांनी या ऑनलाइन जुगारात आपले जीवही गमावले आहेत. काही महिन्यापूर्वी ऑनलाइन जुगारावर कणकवली पोलिसांनी कारवाई केली होती पण पुन्हा या जुगाराने आता डोकं वर काढले आहे. अवैद्य गोवा बनावटीच्या दारूची  कणकवली शहरासह नांदगाव खारेपाटण, तरळे, फोंडाघाट या ठिकाणी  वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे गावातील दारू धंदे तेजीत आले आहेत.

जुगार अड्ड्याची देखील तीच परिस्थिती आहे. एक वर्षापूर्वी मोठे रेड कणकवली पोलिसांनी जुगार अड्ड्यावर केली होती पण त्यानंतर कोणतेही कारवाई या जुगार अड्ड्यांवर झाली नाही शहराच्या लगतच्या गावांमध्ये अजूनही हे जुगार अड्डे तेजित आहेत.

त्यामुळे नूतन कणकवली पोलीस निरीक्षकपदी रुजू झालेल्या  समशेर तडवी यांनी या सर्व अवैद्य व्यवसायाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने देखील या अवैध दारू वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.