अवैध जनावरांची वाहतूक रोखली

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 04, 2025 20:35 PM
views 73  views

कणकवली: तालुक्यातील कनेडी परिसरात अवैधपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी टेम्पो चालक विजय बाजीराव चौगले आणि अंकुश तातोबा चौगले (दोघेही रा. थड्याचीवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची तक्रार चैतन्य मनोहर नाईक यांनी दिली आहे. शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ते हडी फाट्याजवळून येत असताना त्यांना जनावरांनी भरलेला एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो कनेडीच्या दिशेने जाताना दिसला. त्यांनी तत्काळ आपल्या मित्राला याची माहिती दिली. त्यानंतर, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा टेम्पो कनेडी बाजारपेठ ते फोंडाघाट रस्त्यावर अडवण्यात आला.

ग्रामस्थांनी तपासणी केली असता, टेम्पोत एक गाय, एक म्हैस आणि तिचे वासरू अशी तीन जनावरे क्रूरपणे, दाटीवाटीने आणि कोणतीही परवानगी नसताना वाहतूक केली जात असल्याचे आढळले. यावेळी अविनाश चव्हाण, साहिल शंकरदास, निशू कडुलकर, अमित पुजारे, अतिश कांदळकर, यश सावंत, पराग सावंत यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि टेम्पो जप्त केला. संशयितांविरुद्ध पशु संरक्षण कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.