कणकवली महाविद्यालयाच्या अर्चित तांबेची IIT हैदराबादमध्ये निवड

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 04, 2025 17:35 PM
views 90  views

कणकवली : कणकवली महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र पदवी शाखेचा विद्यार्थी अर्चित गुणाजी तांबे याची प्रतिष्ठित अशा आयआयटी हैदराबाद येथील एमएस्सी रसायनशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. याबद्दल त्याचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अर्चित हा फेब्रुवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील आयआयटी - जॅम (जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर एमएससी) या प्रवेश परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर 1105 वा  क्रमांक मिळवून प्रवेशासाठी पात्र झाला होता. या अगोदरही महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाची तेजस्विनी गावित हिची आयआयटी- जॅम या प्रवेश परीक्षेमधून मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जयपुर या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली होती. अर्चितचे यश आमच्या महाविद्यालयासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील मुले-मुली देखील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेऊ शकतात, हे अर्चितच्या यशाने सिद्ध झाले आहे,असे गौरवोद्गार शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी सत्काराप्रसंगी काढले. कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे याप्रसंगी म्हणाले, अर्चितच्या यशामुळे इतर  विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे. 

अर्चितला या प्रवेश परीक्षेत यशस्वी होण्यासाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. शामराव दिसले, प्रा. अविनाश पोरे, प्रा. हेमंत गावित व प्रा. कपिल गडेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सचिव विजयकुमार वळंजू व इतर संस्था पदाधिकाऱ्यांनी अर्चितचे विशेष अभिनंदन केले आहे.