आमदारांची भागीदारी कामात असेल तर काम निकृष्ट होणारच : अतुल रावराणे

करूळ घाटाचे काम निकृष्ट होत असताना सहा महिने नितेश राणे झोपले होते का? | अतुल रावराणे यांचा सवाल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 07, 2024 12:41 PM
views 176  views

वैभववाडी : करूळ घाट हा कोल्हापूर सिंधुदुर्ग जोडणारा व्यापार उद्योगात वृद्धी करणारा आणि मोठ्या प्रमाणात दळणवळण असलेला घाट मार्ग आहे. मात्र  या घाट मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. येथील स्थानिक आमदार नितेश राणे यांनी  काल कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना झापल्याची स्टंटबाजी केली.  मात्र काम निकृष्ट होत असताना सहा महिने नितेश राणे झोपले होते का? घाटाच्या कामात भागीदारी असल्यानेच नितेश राणे अजूनपर्यंत गप्प होते. मात्र  मी स्वतः आणि  शिवसेना पक्षाने या विषयावर आवाज उठविल्यानंतर नितेश राणेंनी मी मारल्यासारखं करतो तू रडल्या सारखं कर असा स्टंट करण्याचा प्रकार काल केला असल्याची टिका शिवसेना कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी केली. 

करूळ घाटमार्ग  हा महत्वाचा मार्ग असून  या मार्गाचे काम दर्जेदार होणे अपेक्षित होते. मात्र ४० टक्के बिलोने टेंडर भरलेल्या ठेकेदाराला हे टेंडर देण्यात आले. या कामाच्या टेंडरची चौकशी व्हावी व रिटेंडर व्हावे यासाठी शिवसेना पक्षाने आवाज उठविला होता.  नितेश राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणल्याने निविदेत कोणतीही अट नसताना बेकायदेशीर रित्या हा घाट ठेकेदाराच्या ताब्यात देण्यात आला. नितेश राणे ६ महिने तिकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे ठेकेदाराला कोणाचे अभय आहे हे लोकांना माहित आहे. त्यामुळे संपूर्ण देशात रस्ते विकास मध्ये नंबर एकचे काम करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यात लक्ष घालून कारवाई करतील का? तसेच घाटमार्गाच्या निकृष्ट कामाबाबत दोषींवर कारवाई करण्याची हिम्मत पालकमंत्री रवींद्र चव्हाण दाखवतील का?असा सवाल  अतुल रावराणे यांनी  केला आहे.