रस्ता पूर्ण न झाल्यास छेडणार उपोषण !

वागदे सरपंच संदीप सावंत यांचा इशारा | ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरणाची डोळेझाक
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 28, 2023 20:11 PM
views 273  views

कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ कणकवली महामार्गावर वागदे येथे उभादेव समोर असलेला अपूर्ण स्थितीतीत रस्ता अद्याप पूर्ण केला नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. या प्रश्नी आठ दिवसात हा रस्ता डांबरीकरण न झाल्यास या रस्त्यावर वागदे ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा वागदे सरपंच संदीप सावंत यांनी दिला आहे.


दरम्यान आठ दिवसापूर्वी यासंदर्भात आमदार नितेश राणे यांचे सुद्धा त्यांनी लक्ष वेधले असून, आमदार नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती श्री सावंत यांनी दिली. वागदे उभादेव समोरील भागात अपूर्ण स्थितीत असलेला रस्ता काही महिन्यांपूर्वी मोकळा झाल्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली परंतु या रस्त्यावर अद्याप डांबरीकरण करण्यात आले नसल्याने या भागात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान या ठिकाणी वारंवार अपघात होत असून महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांच्याकडून या कामाकडे दुर्लक्ष केला जात आहे, या ठिकाणचे काम मार्गी लावण्यासाठी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण डोळेझाक करत असल्याने वागदे सरपंच संदीप सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.