
सावंतवाडी : गेली पस्तीस वर्षे पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणारे ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांच्याबाबत मालवण बीचवर अंमली पदार्थांचा सुळसुळाट नागरिकांत कुजबुज अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केल्यावर काही व्यावसायिक एकत्र येत सत्य दाबण्याचा प्रयत्न करतात, हे निषेधार्ह आहे.या प्रवृत्तीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबा खवणेकर व पत्रकार समिल जळवी यांनी जाहीर निषेध केला आहे. पोलिसांनी प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळच आली नसती असंही मत त्यांनी व्यक्त केल आहे.
वास्तविक, या मागची सत्यता पडताळणे पोलिसांचे काम आहे. ते सोडून एका ज्येष्ठ पत्रकाराला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करा अशी मागणी करणे म्हणजे पत्रकाराची गळचेपी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष या नात्याने आम्ही त्रीव शब्दात जाहीर निषेध करीत आहे. ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गावडे यांच्या पाठीशी उभा आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात येणार आहे अशी माहिती संघाचे अध्यक्ष आबा खवणेकर व पत्रकार समिल जळवी यांनी दिली.










