शेवटपर्यंत लिहित राहीन ! - कवी दीपक पटेकर

आजगाव साहित्य कट्ट्याचा अठ्ठाविसावा कार्यक्रम संपन्न
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 21, 2023 11:37 AM
views 263  views

सावंतवाडी : "स्वतःच्या आनंदासाठी कविता लिहितो आहे, शेवटपर्यंत लिहित राहीन. मी  काॅलेज जीवनात कविता लिहायला सुरुवात केली. जसजशी जाणीवेची कक्षा रुंदावत गेली, तसतशी कविता प्रेम या विषयातून सामाजिक विषयाकडे सरकत गेली. अनेक कविता लिहून झाल्यात, आता त्या पुस्तक रुपात आणण्याचा मनोदय आहे." असे विचार सावंतवाडीतील कवी दीपक पटेकर यांनी आजगाव साहित्य कट्ट्यावर काढले. निमित्त होते साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या अठ्ठाविसाव्या मासिक कार्यक्रमचे.

आजगाव वाचनालयात झालेल्या या कार्यक्रमात ते निमंत्रित वक्ते म्हणून बोलत होते. 

सुरुवातीला कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक करून पटेकर यांचा परिचय करून दिला. ज्येष्ठ सदस्य डाॅ.मधुकर घारपुरे यांचे हस्ते पुस्तके व श्रीफळ देऊन पटेकर यांचा सन्मान करणेत आला. 

     'कवितेचा दीपक ' या शीर्षकांतर्गत कार्यक्रमात बोलताना कवी दीपक पटेकर यांनी 'पहाट', 'शोध', 'मुखवटे' अशा सुरेख वृत्तबद्ध कविता, गझल सादर केल्या, तर 'सत्यम् शिवम् सुंदरम्' या ललित लेखाचे वाचन केले. आपला विषय मांडताना त्यानी वृत्तबद्ध कविता व गझल या आकृतीबंधाविषयीही विस्तृत विवेचन केले. या दरम्यानच्या चर्चेत देवयानी आजगावकर, सोमा गावडे, सरोज रेडकर आणि मीरा आपटे यांनी भाग घेतला. पटेकर यांनी 'शब्दगंध' हा कथासंग्रह व 'संवाद' हा दिवाळी अंक साहित्य कट्ट्याला भेट दिला. कार्यक्रमाला सिंधू दिक्षित, अनिता सौदागर, रश्मी आजगावकर, मानसी गवंडे, प्रिया आजगावकर, वसुधा आजगावकर, प्रकाश वराडकर, एकनाथ शेटकर, उत्तम भागीत, विनायक उमर्ये, आणि स्नेहा नारींगणेकर आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.