
सिंधुदुर्ग : काल सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्याकडून काही रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आली यात शासकीय ठेकेदार व शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे माझ्याशी संबंधित व्यक्ती यांच संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सदरील खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नसून ठेकेदारी किंवा ठेकेदार या बाबतही माझा कुठे संबंध नाही. मी व्यक्तिगत ठेकेदारी करत नाही किंवा कुठल्याही ठेकेदारांशी कुठल्याही शासकीय कामात माझी भागीदारी नाही. आज पर्यंत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी कधीही कुठल्याही ठेकेदाराकडून अर्थसहाय्य किंवा वस्तूरुपात मदत मागत नाही, मदत घेत नाही किंवा त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाही करत नाही असं प्रसिद्धी पत्रकात निलेश राणेंनी म्हटलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांना माझ्या नावावर कुणीही फोन करत असेल किंवा इतर आर्थिक मागणी करत असेल तर त्यांनी याची तक्रार जवळचे पोलीस स्टेशन अथवा जिल्हा पोलीस अधिक्षकांजवळ द्यावी, माझ्या नावाचा वापर करून कुणीही ठेकेदारांकडून किंवा इतर कुणाकडूनही रोख रक्कम अथवा इतर काही मागणी करत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पोलीस अधिक्षकांशीबोलून अश्या व्यक्तींवर कारवाईसाठी सूचित करेन. ज्यांचा व्यवसायच ठेकेदारी आहे त्यांनी अश्या प्रकारे माझ्यावर आरोपकरण्याअगोदर कुठल्याही शासकीय कामात माझा संबंध आल्यास तो पुराव्यानिशी जाहीर करावा असं निलेश राणेंनी आव्हानही दिलं आहे.