
देवगड : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,नवी दिल्ली आणि राज्य आपती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार देवगड तालुक्यामध्ये स.ह. केळकर, महाविद्यालय, देवगड, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे दिनांक ९ नोव्हेंबर, २०२३ या दिवशी “चक्रीवादळ” या विषयावर रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात चक्रीवादळ या आपत्तीच्या अनुषंगाने विविध घटना, प्रसंग उद्भवल्यास देवगड तालुक्यातील महसूल, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जीवन प्राधिकरण, बांधकाम विभाग, तालुका कृषि अधिकारी, पशुधन अधिकारी, वनक्षेत्रपाल, मत्स्यव्यवसाय विभाग व बंदर विभाग या यंत्रणा सहभागी होणार आहेत. वरीलकामी देवगड तालुक्यातील देवगड (आनंदवाडी) या गावाची निवड करण्यात आलेली आहे. सदर रंगीत तालीमीच्या अंतर्गत या गावातील लोकांना स्थलांतरित केले जाणार असून त्यांना सुरक्षित आश्रय स्थानाच्या ठिकाणी ठेवले जाणार आहे. यासाठी स. ह. केळकर, महाविद्यालय, देवगड, ता. देवगड येथे सुरक्षित निवारा गृह देखील निश्चित करण्यात आले आहे. तरी या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना कळविण्यात येते की, चक्रीवादळ आल्यास त्याला संबंधित यंत्रणा कशाप्रकारे प्रतिसाद देतात याची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांचेकडून चाचपणी केली जाणार आहे. या कालावधीत कोणतेही चक्रीवादळ देवगड तालुक्यात येण्याची सद्यस्थितीत शक्यता नाही. केवळ चक्रीवादळ आल्यास त्या अनुषंगाने प्रशाकीय यंत्रणांच्या तयारीची माहिती घेणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी चक्रीवादळ अनुषंगाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
या अनुषंगाने काही माहिती आवश्यक असल्यास तालुका आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष, तहसिलदार कार्यालय, देवगड च्या (०२३६४) २६२२०४ आणि पोलीस ठाणे, देवगड, नियंत्रण कक्ष (०२३६४) २६३४३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, देवगड यांचेमार्फत करण्यात येत आहे.