
दोडामार्ग : दोडामार्ग सावंतवाडा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषदेच्या नावे होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच या शाळेत ये-जा करण्यासाठी मुलांना रस्ता उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, मनोज खांबल, गौतम महाले, केशव काळबेकर व नागरिकांनी उपोषण मागे घेतले.
दोडामार्ग शहरातील सावंतवाडा येथे पी.एम.श्री. जिल्हा परिषद शाळेची स्थापना सन १९९२ साली झालेली आहे. शाळेत मुलांना ये-जा करण्यासाठी हक्काची वाट नाही आहे. शाळेची इमारत जिल्हा परिषदेच्या नावे अजून झालेली नाही आहे. हि शाळा पी. एम. श्री शाळा असून तालुक्यातील एकमेव शाळा आहे. शाळेतील मुलांची पटसंख्या खूप असून वाटे अभावी ती कमी होत चाललेली आहे. शाळेची जमीन जिल्हा परिषदेच्या नावे नसल्यामुळे शाळेतील परिसरात काहीच करता येत नाही. दोडामार्ग नगरपंचायत मधील जास्त पटसंख्या असलेली शाळा असून देखील या समस्येवर कोणीही लक्ष देत नाही आहे असा आरोप करून स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, मनोज खांबल, गौतम महाले यांसह शहरातील नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली.
प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली. शाळा असलेल्या सातबारातील इतर हिसेदारांनी बक्षीस पत्र दिल्याशिवाय शाळेचे नाव लावता येऊ शकत नाही. त्यामुळे ती जागा बक्षीस पत्राने शाळेच्या नावे करण्यासाठी सोमवारपासून प्रयत्न केले जातील, असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना दिले. शाळेलगत असलेल्या खाजगी जमिनीचे मालक अरविंद खांबल हे मुंबई येथे वास्तव्यास असून सहकार्याच्या दृष्टिने त्यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी आपल्या मालकीच्या जमिनीच्या हिस्स्यातील २ मीटर जागा सोडण्यास ते तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे शुक्रवारपासून या जागेतून २ मीटर रस्ता खुला करण्यास संमती दर्शविली आहे. याबाबत विकास आराखडा मंजूर झालेनंतर लेखी संमती देणार असल्याचे कळविले आहे, असे लेखी आश्वासन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांना दिले.