
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि गैरसोयींच्या निषेधार्थ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फिजीशियन, न्यूरोलॉजीस्ट आणि हृदयरोग तज्ज्ञांची पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत. अनेक रुग्णांना उपचारासाठी गोवा बांबोळी येथे जावे लागत आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने काहींनी आपले प्राणही गमावले आहेत. या रिक्त पदांविषयी आणि इतर समस्यांविषयी यापूर्वी निवेदन देऊन आणि २४ मार्च रोजी आंदोलन करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयातील शौचालय, स्नानगृह यांची दुरावस्था झाली आहे. ड्रेनेज टाकी तुंबल्याने आणि पाईपलाईन खराब झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच, शवविच्छेदन कक्षाचीही मोडकळीस आली असून मृतदेहांची अवहेलना होत आहे. रुग्णालयातील जनरेटर नादुरुस्त असल्याने रुग्ण विभागात आणि कार्यालयीन कामकाजात अडथळा येत आहे.या सर्व गंभीर समस्यांवर प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी सांगितले की, जोपर्यंत रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध होत नाहीत आणि इतर सोयीसुविधांची तातडीने दखल घेतली जात नाही, तोपर्यंत १ मे २०२५ पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू ठेवले जाईल. विशेष म्हणजे नियुक्ती झालेल्या डॉक्टरांची प्रत्यक्ष उपस्थिती दिसेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.