
वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा गांधीनगर येथील जलजीवन योजनेच्या टाकीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा त्वरित सुरू न केल्यास प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याबाबत ग्रामस्थांनी सरपंच लतिका रेडकर यांना निवेदन सादर केले आहे.
शिरोडा ग्रामपंचायत येथे सरपंच लतिका रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या विशेष सभेत तिलारी जल योजना अंतर्गत शिरोडा गांधीनगर येथे सुरू असलेल्या टाकीचे बांधकाम व पाईप लाइन काम संदर्भात चर्चा करण्यात आली होती. तेव्हा सभेस श्री. कुंभार (शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण), अनुप वळवी (शाखा अभियंता ग्रा. पा. पुरवठा), विकेश सापळे (नाबार्ड एजन्सी इंजिनिअर), प्रफुल्लकुमार शिंदे (उपअभियंता – ग्रामपंचायत पाणी पुरवठा), बिपीन कोरगावकर (बांधकाम ठेकेदार) यांच्यावतीने टाकीचे उर्वरित बांधकाम येत्या 15 दिवसात पूर्ण करून नंतर तिलारी जल योजना अंतर्गत पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आली होती.
यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, बाबा नाईक , विजय पडवळ , माजी उपसरपंच राहुल गावडे, माजी ग्रा पं सदस्य कौशिक परब , प्राची नाईक , स्वरूपा गावडे तसेच संदीप गावडे, राजू आंदुरलेकर , अशोक परब , श्रीराम नाईक , उदय गावडे, दिगंबर परब , बच्चू मलबारी यांच्या वतीने जबाबदार विभाग अधिकारींच्या वतीने दिलेल्या मुदतीत पाणी पुरवठा सुरू न केल्यास 26 जानेवारी रोजी शिरोडा ग्रामपंचायत येथे नळपाणी योजना धारक व ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
आपल्या निवेदनात ग्रामस्थ म्हणतात – प्रतिवर्षीप्रमाणे यंदा ही गांधीनगर, केरवाडा, वेळागर व काही अन्य भागात भीषण पाणीटंचाईचा सामना आतापासूनच करावा लागत आहे. गुळदुवे तिरोडा येथील नळपाणी योजनेच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा हा अत्यल्प व अपुरा आहे. या भागातील पिण्याच्या व नियमित वापराच्या पाण्याची गरज पाहता तिलारी प्रकल्पाकडून येणारे पाणी पुरवणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता
डोंगरीवाडी, गांधीनगर येथील जलजिवन योजनेच्या अंतर्गत पाण्याची टाकी मागील 3 वर्षा पासून बांधण्यात येत असून संबंधित ठेकेदाराकडून सदरच्या टाकीचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे.
ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी करूनही टाकीचे काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांत अत्यंत नाराजी आहे. याबाबत असलेला जन आक्रोश पाहता दि 23/12/2025 रोजी ग्रामपंचायत वतीने जिल्हा पाणी पुरवठा विभाग व तिलारी पा.पू. योजना विभाग आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत येत्या 15 दिवसात टाकीचे उर्वरित काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करण्या बाबत ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी यांनी आश्वासन दिलेले आहे.
जलजिवन योजनेच्या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत पाणी पुरवठा सुरू न केला गेल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे दिनांक २६ जानेवारी २०२६ या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय, शिरोडा येथे ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे, असे आपणास या निवेदनातून सूचित करत आहोत. गावातील जनतेच्या पाण्याविषयीच्या या विषयाकडे दुर्लक्ष केल्यास जनक्षोभ उसळू शकतो याबाबत जाणीव आपणास आहे. तरी कृपया आपण याप्रश्नी उचित अशी तातडीची कार्यवाही करावी तसेच ग्रामस्थांच्या वतीने आम्हास प्रजासत्ताक दिनी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करण्यास भाग पाडू नये, असा इशारा शिरोडावासीयांनी दिलाय.










