
कणकवली:-गेली दोन वर्षे थांबलेला कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियांचा ओघ आता पुन्हा एकदा सुरु झाला आहे. रुग्णालयात तरूण प्रतिथयश सर्जन डॉ. महेंद्र आचरेकर हे 'एनआरएचएम मधून सेवा देत आहेत. डॉ. आचरेकर यांनी गेल्या दोन महिन्यांत विविध प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया केल्या आहेत. अर्थातच खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये खर्च असणाऱ्या शस्त्रक्रिया आता उपजिल्हा रुग्णालयांमध्ये होऊ लागल्याने सर्वसामान्य, गोरगरिब रुग्णांसाठी ही दिलासाजनक बाब आहे.
वास्तविक उपजिल्हा रुग्णालयात सर्जन हे पद सातत्याने रिक्त राहिले आहे. त्यात २०१४ च्या सुमारास रुग्णालयात प्रतिथयश सर्जन डॉ. अभिवंत हे वैद्यकीय अधीक्षक पदावर रुजू झाले. त्या काळात रुग्णालयात उत्तमोत्तम शस्त्रक्रिया पार पडल्या. मात्र, काही कारणास्तव त्यांना येथून जावे लागल्याने जवळपास पाच वर्षे रुग्णालयाला सर्जन नव्हता. २०१९ च्या दरम्याने रुग्णालयात प्रख्यात सर्जन डॉ. सहदेव पाटील हे देखील वैद्यकीय अधीक्षक याच पदावर नियुक्त झाले. डॉ. पाटील यांच्या काळात अगदी मोठ मोठ्या, वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या नामांकीत रुग्णालयांमध्येच होऊ शकतात, अशा स्वरुपाच्या शस्त्रक्रिया होऊ लागल्या. अर्थात त्याचा सर्वसामान्य रुग्णांना मोठा लाभ होता होता. मात्र, २०२१ मध्ये पाटील यांचे निधन झाले अन् गेली दोन वर्षे रुग्णालयही 'सर्जन विना राहिले.
याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, सर्जन डॉ. आचरेकर हे 'एनआरएचएम'च्या माध्यमातून येथे रुजू झाले आणि पुन्हा एकदा शस्त्रक्रियांचा ओघ सुरु झाला आहे. यात पोट, जांघ व अन्य प्रकारांतील हार्निया, पित्ताशयातील खडे काढणे, मधुमेही रुग्णांच्या जखमांवर उपचार व त्वचारोपण, गर्भपिशवी काढणे, आतड्यांची शस्त्रक्रिया, शरीरावरील ट्युमर, स्तनांच्या गाठी, पोटाच्या शस्त्रक्रिया, मुळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. रुग्णांनीही वरील आजारांबाबत उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्माधिकारी यांनी केले आहे.