
दोडामार्ग : मार्च २०२४ मध्ये झालेल्या शालांत परीक्षेत नूतन विद्यालय कळणे शाळेने सोनेरी यश संपादन केलं आहे. प्रशालेचा निकाल १०० % लागला असून शाळेची विद्यार्थिनी कु. पालवी लक्ष्मण मेस्त्री हिने ९५.८०% गुण मिळवून दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
नूतन विद्यालय कळणे शाळेचा शालांत परीक्षेचा निकाल १०० % लागतो. यावर्षीही परीक्षेचा निकाल १०० % लागला आहे. प्रशालेतून एकूण १८ विदयार्थी परीक्षेला बसले होते ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेतून कु.पालवी लक्ष्मण मेस्त्री हिने ९५.८० % गुण मिळविले. ती शाळेसह दोडामार्ग तालुक्यातही प्रथम आली.
तसेच सायली श्याम गवस हिने ८०.८०% गुण मिळवून शाळेत दुसरी आली. तृतिय क्रमांक गौरी गंगाराम जंगले हिने ७९.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. एकूण १८ विद्यार्थ्यापैकी ०७ विदयार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्त्तीर्ण झाले. तर ०९ विदयार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणित उत्तीर्ण झाले.
प्रशालेच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मोहन देसाई यांनी विशेष कौतुक केलं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नूतन विद्यालय कळणे शाळेत मुलांची बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या दोन वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि प्रा. एम.डी. देसाई कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय , नूतन विद्यालय कळणे यांच्या संयुक्त विद्यमाने '' *आडियल स्कुल ऑफ म्युझीक*'' हा संगीत क्लास सुरु करण्यात आला आहे. संगीत क्लासची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अधिकचे १२ गुण दहावीच्या विद्यार्थाला मिळतात. यामुळे मुलांची गुणवत्ता अधिक वृब्द्धिंगत होण्यास मदत झाली आहे.
तालुक्यात प्रथम आलेल्या कु.पालवी लक्ष्मण मेस्त्री तसेच उत्तीर्ण सर्व विद्यार्थी , यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.मोहनराव देसाई, शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देसाई, शिक्षक, पालक वर्गातून या यशाचे अभिनंदन करण्यात येत आहे.