बदलत्या हवामानात कशी घ्याल आंबा पिकाची काळजी..?

Edited by:
Published on: January 09, 2024 19:02 PM
views 177  views

वेंगुर्ला : सिंधुदूर्ग जिल्हयात गेले दोन तीन दिवस हवामान ढगाळ आहे तसेच काही भागात सकाळी धुके पडत आहे. त्याचप्रमाणे काही भागात दिनांक ०८ व ०९ जानेवारी रोजी पाऊस पडला आहे. त्याचा विपरीत परिणाम आंबा पिकावर संभवतो.

अनेक आंबा बागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर मोहोर आला असून ज्या बागांमध्ये मोहोर नाही त्या बागामध्ये मोहोर फुटण्यास सुरूवात झाली आहे. पावसामुळे व धुक्यामुळे पालवीवर तसेच मोहोरावर करपा रोगाची शक्यता आहे. त्यामुळे पालवीवर व मोहरावर तपकिरी रंगाचे ठिपके उठून पालवी व मोहोर खराब होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान ढगाळ असल्यामुळे तुडतुड्याची पैदास मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

तुडतुड्यांनी पालवी व मोहोरातुन रस शोषल्यामुळे पालवी व मोहराचे नुकसान होईल. पालवी व मोहरावर चिकटा पडुन त्यावर काळी बुरशी वाढेल. अशा परिस्थितीत ज्या बागांमध्ये पहिली फवारणी होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. अशा बागांमध्ये डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने शिफारस केलेली दुसरी फवारणी घेण्यात यावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मिली व कार्बेनडॅझिम १२ टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के (तयार मिश्रण) १० ग्रॅम १० ली पाण्यातून फवारावे अशी माहिती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यामार्फत देण्यात आली आहे.