मी किती वेळा येतो याच्यापेक्षा मतदारसंघासाठी किती काम करतो हे महत्त्वाचं : दीपक केसरकर

होडावडा येथे सुमारे १ कोटी रुपयांच्या पुलाचे भूमिपूजन
Edited by: दिपेश परब
Published on: February 19, 2024 14:56 PM
views 369  views

वेंगुर्ले : आपल्याला सर्वांना एकत्र राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करायचे आहे. मोदी यांनी जो भारताचा विकास केला तो गेली अनेक वर्ष झाला नव्हता. माझ्या मतदारसंघातील जेवढ्या पुलांची मी आश्वासन दिली होती ती सर्व पूर्ण केली आहेत. आपल्याला निश्चित धोरण समोर ठेवून काम करायचं आहे. शेतकरी, महिला यांचे उत्पन्न वाढेल त्या दृष्टीने सिंधु रत्न योजनेतून आपण प्रयत्न करत आहोत. गावाच्या विकासामध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे व एक धोरण ठरवलं पाहिजे. महाराष्ट्राच्या पुढे सुद्धा कोकण जाऊ शकतो हे आपल्याला पुढील काळात दाखवून दिलं पाहिजे. मी मतदार संघात किती वेळा येतो याच्यापेक्षा मतदारसंघासाठी किती काम करतो हे महत्त्वाचं आहे. आंबा, काजू शेतकरी व महिलांच्या होताना रोजगार मिळण्यासाठी काय पाहिजे ते तुम्ही स्थानिक पातळीवर सरपंच किंवा सिंधू रत्न योजनेच्या कार्यालयात सांगा. जे काही पाहिजे ती प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून दिली जाईल असे ठोस आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी होडावडा येथे बोलताना दिले.

पुरवणी अर्थसंकल्प २०२२ अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील आडेली-वजराट- होडावडा- तळवडे- मातोंड- आजगाव रस्ता प्रजिमा ५६ कि.मी. ५/१०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे या १ कोटी ३१ लाख १२ हजार ११८ रुपयांच्या होडावडा येथील विकास कामाचे भूमिपूजन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी होडावडा सरपंच सरपंच रसिका केळुसकर, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, तहसीलदार ओंकार ओतारी, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी, कोचरे सरपंच योगेश तेली, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, सदस्य अरविंद नाईक, अनन्या धावडे, अमृता साळगावकर, संदीप सातार्डेकर, अर्जुन दळवी, विनया दळवी, सार्वजनिक बांधकाम चे उप अभियंता श्री भगत, ठेकेदार साई रंग कन्स्ट्रक्शन चे श्री नायडू, रवी केळुस्कर, आनंद पुराणिक, अण्णा वजराटकर, शैलजा साळगावकर, विनया दळवी, शाखाप्रमुख परेश मुळीक, विलास सावंत, माजी सरपंच अदिती नाईक, भाऊ दळवी, सामाजिक कार्यकर्ते मनोहर नाईक, सिंधू रत्न योजनेचे सुरज परब आदी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना मंत्री केसरकर म्हणाले की, १०० लोकांना आपण पर्यटनामधून घर दिली आहेत. याची पहिली यादी तयार झाली आहे. पुढच्या काळात शेतीचं मेकॅनिझेशन केलं पाहिजे यासाठी मुलांना शेतीविषयक शिक्षणाचा वेगळा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. याला लागणारी सगळी मदत सिंधू रत्न मधून देण्यात आलेली आहे. आपण आता सर्व महिलांना परसबागेतील कुक्कुटपालन ही योजना राबवत आहोत. यामध्ये या कुकूटपालनातील एक अंड १० रुपया प्रमाणे विकत घेतले जाणार आहे. 

येत्या २५ तारीखला आमचा जर्मनीमधील बेडन युटरबर्ग या राज्याबरोबर करार होत आहे. यात आपल्याकडे जे टेक्निकल शिक्षण घेतलेली मुलं आहेत त्या सर्वांना जर्मन भाषा शिकवायची व त्यांना जर्मनीमध्ये नोकऱ्या द्यायच्या आहेत. जवळजवळ ४ लाख लोक त्यांना या एका वर्षामध्ये पाहिजे आहेत. लवकरच सिंधुरत्न योजनेच्या कार्यालयात या मुलांची यादी करण्यात येईल असेही यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले. 

मला संपूर्ण राज्यातील राजकारणावर लक्ष ठेवावा लागतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर कोणी टीका केली तर त्याला उत्तरे द्यावी लागतात. पण आम्ही कोणावर टीका करत नाही जे टीका करणारे असतात ते आयुष्यात कधीच काम करू शकत नाहीत. एक पाणबुडी या ठिकाणी आली असती तर वेंगुर्ल्याला हजारो पर्यटक आले असते. पाणबुडी साठी ५२ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातील एक रुपया सुद्धा त्यांना खर्च करता आला नाही. आणि मग काहीतरी टीका करायची आणि त्यांची काही छोटी छोटी पिल्लं असतात ती जिथे तिथे बोर्ड लावत फिरतात. असेही केसरकर म्हणाले.