
सावंतवाडी : विशाल परब यांच्या माध्यमातून काल देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचा वापर रुग्णांना गोवा किंवा परजिल्हयातील नेण्यासाठी अजून किती वर्ष करावा लागणार आहे ? जिल्ह्याच्या आरोग्याचा प्रश्न केवळ जनतेला रुग्णवाहिका देवून सुटणारा नाही. तर त्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम व अद्ययावत करावी लागेल. त्याकडे पालकमंत्री यांच्यासह अन्य सत्तेवर असलेल्या नेतेमंडळींनी लक्ष द्यायला हवे. त्यांनी व्हेंटीलेटरवर असलेली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तात्काळ सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी केले आहे.
सावंतवाडी येथे काल भाजपच्यावतीने 6 रुग्णवाहिकांचा लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. यापूर्वी देखील अनेक राजकीय पक्ष अगर संस्थांमार्फत अशा प्रकारे रुग्णवाहीका लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर एकाच वेळी सहा रुग्णवाहिका अशा प्रकारे जनतेसाठी लोकार्पण करण्याचा कार्यक्रम यापूर्वी झाला नसेल व तसा कार्यक्रम केल्याबद्दल विशाल परब त्यांचे अभिनंद असे मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी म्हटले आहे.
मात्र, ग्रामीण भागातील जनतेला आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती सक्षम अशा आरोग्य यंत्रणेची. अनेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये आज आरोग्य अधिकारी नाहीत, साध्या साध्या आजारांबाबत योग्य निदान होत नाही, औषधांचा योग्य पुरवठा नाही. उपजिल्हा रुग्णालये केवळ प्राथमिक औषधोपचार केंद्रे बनली आहेत, मशिनरी आहे पण चालवायचा तज्ञ व्यक्ती नाहीत. गंभीर रुग्णांना गोवा, कोल्हापूर, बेळगांव शिवाय पर्याय नाही. भरमसाठ पैसे खर्च करुन देखील आपला माणूस परत बरा होईल याची खात्री नाही, ओरोस येथे मेडिकल कॉलेज सुरु करण्यात आले मात्र तेथील काहि वैद्यकीय अधिकारी रुग्णाला अन्य रुग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला देतात. मात्र जिल्ह्यातील या आरोग्य समस्या असताना या कडे लक्ष द्यायला पालकमंत्री यांना वेळ नाही किंव्हा या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तरी जात नसतील. हे आपल्या जिल्हावासियांच दुर्दैव आहे. असे केसरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.