महावितरण आणखीन किती बळी घेणार..?

कधीपर्यंत करणार माणसाची पैशांत किंमत..? जिल्ह्यातील सातवी दुर्घटना ; दोषींवर कारवाई करा : अशोक सावंत
Edited by: विनायक गावस
Published on: October 16, 2023 12:52 PM
views 1050  views

सावंतवाडी : वीज वाहिनीतील बिघाड दूर करण्यासाठी विजेच्या पोलावर चढलेल्या कंत्राटी वायरमन अमोल करंगुटकर (वय २४) याचा विजेच्या पोलवरच शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थानी आक्रमक पावित्रा घेत मृत वायरमन अमोल यांच्या कुटुंबीयांना महावितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी लावून धरली. जोपर्यंत नुकसान भरपाई बाबत ठोस निर्णय होत नाही, अथवा या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह खाली उतरवणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर जवळपास साडेसहा तासानंतरंतर हा मृतदेह पोलावरून खाली उतरवण्यास ग्रामस्थांनी अनुकूलता दर्शवली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेचे वृत्त समजताच कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत, जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर आणि कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्ह्यात विजेचा शॉक लागून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू होण्याची ही सातवी घटना आहे. या दुर्घटना कुठेतरी थांबायला हव्यात. मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी अशोक सावंत यांनी यावेळी केली.

अमोल करंगुटकर हा आरोस गावातील युवक अलीकडेच अडीच तीन महिन्यांपूर्वी महावितरण मध्ये कंत्राटी वायरमन म्हणून नोकरीला लागला होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. रविवारी दुपारी गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तो विजेच्या पोलावर चढला असता विजेचा तीव्र धक्का लागून तो जाग्यावरच मयत झाला. ही दुर्घटना समजताच याठिकाणी संपूर्ण गाव जमा झाले. अमोल याची घरची परिस्थिती बेताची असून त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, तोपर्यंत त्याचा मृतदेह खाली उतरवणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. येथे आलेल्या पोलीस पथकाला देखील ग्रामस्थांनी आपली भूमिका सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येण्याची सूचना केली. त्यानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण येथे दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी नुकसान भरपाईच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले. अन्यथा वीज वितरणचे अधिकारी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जवळपास तीन तासांहून अधिक वेळ ही चर्चा सुरु होती. अखेर ९.३० नंतर ग्रामस्थानी मृतदेह खाली घेण्यास तयारी दाखवली. याठिकाणी शेकडो ग्रामस्थांचा जमाव उपस्थित होता.

जिल्ह्यातील ही सातवी दुर्घटना ; दोषींवर कारवाई करा : अशोक सावंत

या दुर्घटनेचे वृत्त समजताच कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत, जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर आणि कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्ह्यात विजेचा शॉक लागून कंत्राटी वायरमन दगावण्याची ही सातवी घटना आहे. नियमाप्रमाणे कंत्राटी वायरमनना विजेचा पोलावर चढवू नये, असे आदेश आहेत. असे असतानाही अधिकारी या वायरमनना पोलावर चढण्यास भाग पाडतात. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, असे अशोक सावंत यांनी स्पष्ट केले. यासाठी वेळप्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल. याबाबत जिल्ह्यातील सर्व कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन दिशा ठरवली जाणार आहे. जिल्ह्यात सातत्याने अशा दुर्घटना घडत असून दुर्घटनेनंतर अधिकारी आणि ठेकेदार हात वर करून मोकळे होतात. हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत, असे ते म्हणाले.