साडेसात वर्षात सत्ताधारी भाजपनं आडाळीत किती उद्योग आणले ?

सुप्रिया सुळेंच्या भाषणानं भाजपची मंडळी बिथरलीत ; रेवती राणेंचा पलटवार
Edited by: विनायक गावस
Published on: October 30, 2023 16:06 PM
views 269  views

सावंतवाडी :  मुळात महाविकास आघाडी शासनाच्या काळातच आडाळी एमआयडीसीतील पायाभूत सुविधांची कामे मार्गी लागलीत. भारतीय जनता पक्षा सारखी फसवी आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच दिली नव्हती. खासदार सुप्रिया सुळे यांनी केवळ एक भाषण केलं तर भाजपची मंडळी एवढी बिथरलीत. कारण, त्यांचं भाषण हे जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठीची तळमळ काय असते ते दाखविणार होत. साडेसात वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने आडाळी एमआयडीसीत किती उद्योग आणले ? याची माहिती एकनाथ नाडकर्णींनी द्यावी. तर गाजर दाखवणे हा भाजपाचा जन्मसिद्ध हक्क आहे असा पलटवार राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे यांनी केला.

केंद्रात, राज्यात तुमचे सरकार आहे. तुमच्या मंत्र्यांच्या प्रयत्नाने आडाळीत दहा उद्योग येऊ शकतात. मात्र, त्यासाठी जनतेमधील बेरोजगारीच्या प्रश्नांची माहिती असावी लागते. भारतीय जनता पक्षा सारखी फसवी आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच दिली नव्हती. गाजर दाखवणे हा भाजपाचा जन्मसिद्ध हक्क आहे. एकनाथ नाडकर्णी यांनी आधी गेल्या दहा वर्षात त्यांच्या नेत्यांनी आडाळीबाबत किती आश्वासने दिली याची आठवण करुन पहावी. अगदी आडाळी ग्रामस्थांनी लॉंग मार्च आंदोलन केल्यानंतर त्यांच्याच सरकारमधील मंत्री एक महिन्यात परदेशी कंपनीचा उद्योग सुरु करणार होते. हे तर अगदी ताज आश्वासन आहॆ. त्यामुळे नाडकर्णीना ते आठवत देखील असेल. काय झालं कुठं अडकला तो उद्योग? मंत्री केसरकर यांच्या आर्यन्स ग्रुपच्या 1500 कोटीच्या हायड्रोजन आणि बॅटरी निर्मिती उद्योगाचा आडाळीत पत्ताच नाही. साडेसात वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने आडाळी एमआयडीसीत किती उद्योग आणले ? किती आश्वासन दिली याची माहिती जनतेला आहॆ. महाविकास आघाडी शासनाच्या काळातच आडाळी एमआयडीसीतील पायाभूत सुविधांची कामे मार्गी लागली आहेत. आज आडाळीत बदललेलं चित्र हे महाविकास आघाडीच काम आहे. त्यामुळे सत्तेत असताना आम्ही काय केलं हे जनतेला विचारा, त्याच जनताच उत्तर देईल असं पलटवार राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे यांनी केला.

भाजप केंद्रात गेली नऊ वर्षे सत्तेत आहे. आज केंद्रातील उद्योग खात भाजपकडे आहॆ. राज्यात उद्योगमंत्री तुमच्या मित्र पक्षाचे आहेत. दोघेही सिंधुदुर्ग मधील आहेत. शिवाय दीपक केसरकरांच्या बोलण्यात कायम उद्योगाचा ध्यास असतो. एवढी ताकद असताना आडाळीत उद्योगांची स्पर्धा दिसायला हवी होती. पण प्रत्यक्षात त्यांच्या माध्यमातून एकही उद्योग आला नाही. केवळ मोठमोठी आश्वासन दिल्याने जनतेचा प्रश्न सुटत नाही. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही आडाळी बाबत आश्वासन दिले नाही. कारण जनतेच्या प्रश्नांवर काम करणारा आमचा पक्ष आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी केवळ एक भाषण केलं तर तुम्ही एवढे बिथरलात. कारण त्यांचं भाषण हे जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठीची तळमळ काय असते ते दाखविणार होत. आम्ही आमच्या अजेंड्यावर उद्योग हा विषय घेतला आहे. वरिष्ठाच्या मार्गदर्शनखाली आम्ही कालबद्धपणे काम करणार आहोत. मोठ्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्षातलं लहान काम हे जनतेला हवं असतं. कदाचित जनतेला दिलासा देण्यासाठी आम्हाला आपलं सहकार्य लागलं तरी ते देखील घ्यायला आम्हाला कमीपणा वाटणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ ही जनतेशी जोडलेली आहे. त्यामुळे नाहक टिका करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा. विकासाची स्पर्धा करा. जनतेला रोजगार हवा आहॆ, मनोरंजनासाठी त्यांच्याकडे भरपूर साधन आहेत. याचं भान भाजपच्या नेत्यांनी ठेवावं. राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेच्या प्रश्नावर काम करणारा पक्ष आहॆ. त्यामुळे सत्तेत असतानाही काम केलं आणि विरोधात असतानाही कामच करतो. फसवी आश्वासन देत नाही. आयुष प्रकल्पाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आडाळीत भूखंड दिला. दोन वर्षे झाली तरी आपल्या मंत्र्यांना त्याचे भूमिपूजन करता आलं नाही. यावरून भाजप सरकारची सिंधुदुर्गातील बेरोजगार युवकाप्रती असलेली आस्था दिसून येणारी आहे असं सौ. रेवती राणे म्हणाल्या.