मुसळधार पावसाचा घरांना फटका

Edited by: मनोज पवार
Published on: November 03, 2024 18:35 PM
views 267  views

लांजा : बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसासह आलेल्या वादळाने भांबेड बाजारपेठेतील दोन घरांना जोरदार तडाखा बसला असून या वादळात दोन घरांचे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे

गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाने पूर्णपणे उघडीप केल्याने पाऊस गेला अशी शक्यता वाटत असतानाच बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस जोरकसपणे बरसला. संपूर्ण तालुक्यात हा पाऊस कोसळला असला तरी भांबेड पेठदेव बाजारपेठ या ठिकाणी पावसासह आलेल्या वादळाने येथील दोन घरांना जोरदार तडाखा दिला. यामध्ये दोन घरांवर असलेले सिमेंट पत्रे तसेच छपरासह कौले उडून गेल्याने या दोन घरांचे मोठ्या नुकसान झाले आहे. यामध्ये शैलजा जयराम गांधी यांच्या घराचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे विलास परब यांचे घराचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . या घटनेचा पंचनामा आज गुरुवारी ३१ ऑक्टोबर रोजी भांबेड मंडळ अधिकारी श्री. मराठे तसेच कोतवाल विजय दळवी यांनी केला.