घराला आग ; साडेतीन लाखांचं नुकसान !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 15, 2024 08:37 AM
views 404  views

मालवण : वायरी भूतनाथ मोरेश्वर वाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरास रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत घरासह, आतील सर्व साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. यात तोडणकर यांचे सुमारे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.    

तालुक्यातील वायरी भूतनाथ येथील मोरेश्वरवाडी येथे विक्रम तोडणकर यांचे राहते घर आहे. तोडणकर यांचा मासेमारीचा व्यवसाय असल्याने ते रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घरास कुलूप लावून व्यवसायासाठी सहकाऱ्यांकडे गेले. तर तळाशील येथील होडी दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या किशोर चोडणेकर यांच्या घराकडे घरातील नातेवाईक गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. यात रात्री साडे बारा वाजण्याच्या दरम्यान घरास अचानक आग लागली. आगीचा लोळ पसरल्याचे दिसताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीच्या भडक्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण बनले. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. 

     या आगीत एलईडी टीव्ही, लाकडी कपाट, फॅन, शेगडी, रोख २३ हजार ७०० रुपये, इतर कागदपत्रे व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी वसंत राठोड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. आगीत तोडणकर यांचे सुमारे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.