
मालवण : मालवण कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही म्हणून काही तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची तसेच हॉटेलच्या साहित्याची तोडफोड केल्याची घटना काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार मालवण पोलिसांनी या जमावातील संशयित वैभव मयेकर (रा. धुरीवाडा मालवण) याच्यासह अनोळखी सहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित वैभव मयेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत कुंभारमाठ येथील खालसा ढाब्याचे बलजिंदर निर्मल सिंह (मूळ रा. विजयनगर- गंगानगर, राजस्थान, सध्या रा. कुंभारमाठ गोवेकर वाडी, ता. मालवण) यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत मालवण पोलीसांनी जमावातील संशयित वैभव मयेकर यांच्यासह अन्य ६ अनोळखी व्यक्तींवर भारतीय नाय संहिता २०२३ चे कलम १०९(१), ३११, ११८(२), १८९ (४), १९०, ३५१ (३), ३५२, ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित वैभव मयेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे करत आहेत.