
सावंतवाडी : सांगेली - सावरवाड येथील सदानंद रावजी म्हाडगूत यांच्या मालकीच्या बागायतीला अचानक लागलेल्या आगीत काजू बांबू सुपारी, नारळांच्या झाडांसह बागेतील पाण्याची प्लास्टिक पाईपलाईन जळून सुमारे दहा लाखाची हानी झाली. या आगीची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी सदानंद म्हाडगूत यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. सदानंद म्हाडगूत यांनी आपल्या मालकीच्या १५ एकर जमिनीत १५०० काजू कलमे, एक हजार बांबूची झाडे, दोनशे सुपारी झाडे, नारळाची ६० झाडे व अन्य बागायत केली आहे .बागेतील झाडांसाठी प्लास्टिक पाईपद्वारा पाणीपुरवठा केला आहे. मंगळवारी दुपारी बागेत कोणीही नसताना अचानक आग लागून बागेतील झाडे जळाली. हा प्रकार सायंकाळी त्यांच्या निदर्शनास आला.
आग कशी लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. बागायत जळून सुमारे दहा लाखांची हानी झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती तलाठ्यांना देण्यात आली असून याबाबत म्हाडगूत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देत घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.