वेंगुर्ल्यात वैश्य समाज संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Edited by: दिपेश परब
Published on: June 27, 2024 14:04 PM
views 250  views

वेंगुर्ले : जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावेच लागतील, तरच आपण यशाच्या राजमार्गावर पूढे जावू. नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. असे मत सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह. पतसंस्था फोंडाघाट चे उपाध्यक्ष गणेश कुशे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य आणि वह्यांचे वाटप करण्यात आले.  

वेंगुर्ला तालुका वैश्य समाज संस्थेचा वार्षिक विद्यार्थी गुणगौरव आणि शैक्षणिक आर्थिक मदत वितरण कार्यक्रम येथील साई मंगल कार्यालय येथे गणेश कुशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुका वैश्य समाज अध्यक्ष सुनिल डुबळे, उपाध्यक्ष सुहास गवंडळकर, खजिनदार सुरेश भिसे, शिरोडा प्रतिनिधी तथा जेष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, म्हापण प्रतिनिधी आकाश नार्वेकर उपस्थित होते.

सुनिल डुबळे यांनी प्रास्ताविकात वैश्य समाज संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले.आपण आपल्या समाज ऋणातून कधीच उतराई होऊ शकत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावी, आणि पदवी परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, अनंत अशोक स्वार, श्रीमती विद्या महादेव शिरसाट आणि राजेश गुरूनाथ शिरसाट यांच्या देणगीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत देण्यात आली. वैश्य समाज संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यापारी माजी नगरसेवक राजीव राधाकृष्णन पांगम. आणि निवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ विष्णू गोवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह. पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होऊन संचालक पदावर वर्णी लागल्या बद्दल गणेश कुशे आणि सुनिल डुबळे यांचा सत्कार करण्यात आला. 

गणेश कुशे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक एकतेची गरज आणि आपल्या जडणघडणीत त्याची उपयुक्तता या विषयी विचार व्यक्त केले. या वर्षी पासून लागू होणारे नवीन शैक्षणिक धोरणा विषयी विस्तृत माहिती दिली. शिक्षण क्षेत्रात विविध आमुलाग्र बदल करून त्यांची यथोचित अंमलबजावणी केल्या बद्दल त्यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे विशेष आभार मानले. वैश्य समाज पत संस्थेच्या विषयी माहिती देताना संस्थेच्या विविध योजनांचा लाभ हा प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन केले. वैश्य समाज सह. पत संस्था वेंगुर्ला शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सभासद होण्यासाठी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील मोठ्या संख्येने वैश्य समाजातील ज्ञाती बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कपिल पोकळे यांनी केले तर आभार अमृत काणेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन अंधारी, अनुप काणेकर, राकेश सापळे, गणेश अंधारी, तन्मय मुळीक. आर्यन डुबळे यांनी परीश्रम घेतले.