शेर्लेत आजी-माजी सरपंचांचा सत्कार!

सिद्धार्थनगरचा पुढाकार
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 02, 2023 21:15 PM
views 274  views

सावंतवाडी : तालुक्यातील शेर्ले येथे नवनिर्वाचित सरपंच प्रांजल जाधव आणि मावळते सरपंच उदय धुरी या द्वयींचा सत्कार सिद्धार्थनगरच्या वतीने नुकताच करण्यात आला. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांनी स्वागत करून निवडणुकीतील राजकारण आता संपल्याने गावातील वातावरण खेळीमेळीचे व बंधुत्वाचे व्हावे हा उद्देश घेऊनच सदर कार्यक्रम होत असल्याचे सांगितले. मावळते सरपंच उदय धुरी यांच्या विकासात्मक दूरदृष्टीचे अभिनंदन केले. तर नवनिर्वाचित सरपंच प्रांजल जाधव यांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित सरपंच प्रांजल जाधव यांचा सपना जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर उदय धुरी यांचा सत्कार मोहन जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आला. अमित जाधव यांनी पोष्ट खात्यात खातेबाह्य कर्मचारी म्हणून आपल्या कंत्राटी नोकरीची सुरुवात करून पोस्टमन ते लेखनिक या पदावर वर्षभरातच पदोन्नती मिळवल्याने त्यांचाही सत्कार धम्मचारी तेजबोधी यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमात सर्व सत्कारमूर्तीनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात धम्मचरी तेजबोधी, लक्ष्मण जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश जाधव यांनी केले. शेवटी मंडळाचे अध्यक्ष महादेव जाधव यांनी आभार मानले.