
सावंतवाडी : सावंतवाडीतील वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार चळवळीतील २५ वर्षांच्या योगदानाबद्दल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ओरोस सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात पतसंस्थेचे व्यवस्थापक विष्णुकांत परब आणि कर्ज व्यवस्थापक किशोर चिटणीस यांनी डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. यावेळी कृ. रा. धुळप, सहाय्यक निबंधक, कणकवली, एस.एस.कदम, सहाय्यक निबंधक, सावंतवाडी व एस.पी. मरभळ, सहाय्यक निबंधक, कुडाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था व मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 'पतसंस्थांचे सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा ' आयोजित करण्यात आली होती. जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी या ठिकाणी ही कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा देणाऱ्या सहकारी पतसंस्थांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ आणि क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत सहकारी पतसंस्थांचे सक्षमीकरण व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ बाबत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.