प्रामाणिक - निष्कलंक सेवेची ३० वर्षे

निगुडे गावचे सुपुत्र सुधाकर राणे सेवानिवृत्त
Edited by: भगवान शेलटे
Published on: September 01, 2024 06:53 AM
views 768  views

बांदा  | भगवान शेलटे : एकाच आयुष्याची "सेकंड इंनिंग" म्हणजे सेवानिवृत्ती. सेवा निवृत्त झालेला मनुष्य जरी त्याच्या सेवेतून मुक्त झाला असला तरीही त्याच्या त्या अनुभवाची समाजाला गरज असते.  त्या व्यक्तीने आयुष्यात  केलेला संघर्ष, अनेक चढउतार पाहून  ती व्यक्ती त्या पदापर्यंत पोहचलेली असते. असचं एक हसतमुख नेहमी इतरांना मदतीसाठी पुढे असणारे व्यक्तिमत्व म्हणजे निगुडे गावचे सुपुत्र सुधाकर तातोबा राणे. सुधाकर राणे हे मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उप्रकम अर्थात 'बेस्ट' मधून ३० वर्षांच्या सेवेनंतर ३१ ऑगस्ट २०२४ ला निवृत्त झालेत. प्रामाणिक - कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या सेवा कालावधीत नावलौकिक मिळवला होता. 

बालपण निगुडे गावात 
सुधाकर राणे यांचं बालपण निगुडे गावात गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण निगुडे गावात तर माध्यमिक शिक्षण मडुरा हायस्कूलला झालं. अभ्यासात हुशार असणाऱ्या सुधाकर राणे यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडीतील पंचम खेमराज (SPK) महाविद्यालयातून पूर्ण केलं. 

नोकरीसाठी मुंबई गाठली     
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राणे यांनी नोकरीसाठी मुंबई गाठली.  ८८ - ८९ च्या दरम्याने मुंबई गाठल्यानंतर काही वर्षे त्यांनी खासगी नोकरी केली. त्यानंतर ऑक्टोबर १९९४ मध्ये त्यांनी बेस्टमध्ये नोकरीस सुरवात केली. सुरवातीला त्यांनी सामुग्री व्यवस्थापन विभागात काम केलं. त्यांनतर कर्मचारी विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत ते या पदावरून ३१ ऑगस्ट २०२४ ला सेवानिवृत्त झालेत. बेस्टच्या नोकरीने आपल्याला सर्व काही दिल्याचं त्यांनी कोकणसाद LIVE शी बोलताना सांगितले. बेस्ट मधील सर्व कर्मचारी  तसेच अधिकारी वर्गाचं आपल्याला चांगलं सहकार्य लाभल्याचं ते  आवर्जुन सांगतात. 

कुटुंब आणि मित्र परिवाराची साथ

आपल्या या प्रवासात आपली पत्नी समिधा आणि मुलगा यांची साथ, आई - वडिलांचे आशीर्वाद, सर्व भावा बहिणींची खंबीर साथ त्याचबरोबर मित्र परिवाराची साथ लाभल्याचे ते सांगतात. या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा प्रवास सोपा नसल्याचं ते सांगतात. 


सामाजिक कामात योगदान     
समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ, कुटुंबातले संस्कार यामुळे ते नेहमीच इतरांना मदत करत असतात. गावातील गरजू नागरिकांना वैद्यकीय तसेच इतर मदत करत आलेत. त्याचबरोबर वृद्धाश्रम तसेच अनाथाश्रमालाही ते मदत करत असतात. सामाजिक - राजकीय क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तीमत्वांशी त्यांचे चांगले सबंध असल्याने या माध्यमातूनही त्यांनी अनेकांना मदत केली. गावच्या शाळा तसेचं मंदिरालाही त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. निवृत्तीनंतरच्या काळातही आपण समाजासाठी काहीतरी करत राहणार असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.