झाडावरून पडून होमगार्डचा मृत्यू !

तिलारीतील दुर्घटना
Edited by: संदीप देसाई
Published on: March 13, 2024 14:51 PM
views 1155  views

दोडामार्ग :  तिलारी मुख्य वसाहत येथे झाडावरून पडून ३५ वर्षीय होमगार्ड असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची  घटना बुधवारी दुपारी २:३० वा.च्या सुमारास घडली. बाळकृष्ण विश्वनाथ जाधव (रा. साटेली-भेडशी, विमानतळवाडी) असे त्या दुर्दैवी होमगार्डचे नाव आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात मित्रपरिवार, सहकारी होमगार्ड यांनी मोठी गर्दी केली होती. गो या नावाने परिचित असलेला हा युवक अनेकांचा जवळचा मित्र म्हणून परिचित होता. त्याच्या या दुर्दैवी मृत्यूनंतर अनेकांना अश्रू अनावर झाले.

       होमगार्ड खात्यात दोडामार्ग येथे होमगार्ड म्हणुन कार्यरत असलेला बाळकृष्ण अधीक तो साटेली-भेडशी बाजारपेठेतच होमगार्ड म्हणून काम पाहयाचा. त्यामुळे प्रत्येकाशी त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. सध्या दहावीची परिक्षा सुरू असल्याने न्यु इंग्लिश स्कुल भेडशी येथे परीक्षा केंद्रावर तो सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावत होता. बुधवारी दुपारी सेवा बजावल्यानंतर  दुपारी आपल्या घरी गेला. त्यानतंर जेवण करून तिलारीला गेला. तेथेच दुपारी  झाडावरून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. झाडावरून पडल्यानंतर त्याला लागलीच साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासले असता ते मृत असल्याचे घोषित केली. त्यांच्या निधनाची वार्ता तालुक्यात पसरताच त्यांच्या मित्रपरिवाराने आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली. बाळकृष्ण जाधव हे गेल्या दहा वर्षांपासून तालुक्यात होमगार्ड म्हणून सेवा बजावत होते. प्रामाणिकपणे तो होमगार्ड म्हणून काम करीत असे. त्याची आधिक ती सेवा ही साटेली-भेडशी बाजारपेठेत असायची. यामुळे बऱ्याच लोकांशी त्याचा संपर्क असायचा. तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी विशेषत सार्वजनिक गणेशउत्सव, नवरात्र उत्सव, होळी या सणाना तो सुरक्षा व नियंत्रण राखण्यासाठी नेहमीच कार्यरत असे. कोरोना कालावधीत सुद्धा त्यांनी चांगली सेवा बजावली होती. त्याचबरोबर दोडामार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अनेक पोलिस सहकाऱ्यांशीही त्याचे आपुलकीचे सबंध होते. या दुःखद घटनेने अनेकांना अश्रु अनावर झाले. अनेक जुने नवीन पोलिस, होमगार्ड प्राथमिक आरोग्य केंद्रात ही दुःखद घटना समजताच दाखल झाले. त्यांच्या या अकाली निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

गेली अनेक वर्ष तिलारी मुख्य वसाहत येथे त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. त्यांचा खानावळ हा व्यवसाय होता. यामुळे अनेकांशी त्यांचा नेहमीच संपर्क असायचा. अलीकडेच ते साटेली-भेडशी विमानतळवाडी येथे राहण्यास आले होते. तेथेही त्यांचा खानावळ व्यवसाय चालू आहे. एस.टी. बसेसचे चालक वाहक, सरकारी कर्मचारी यांना जेवणाचे डबे पुरवित. याकामी बाळकृष्ण जाधव यांचीही घरच्यांना मदत असायची. बुधवारी सेवा बजावल्यानंतर मधल्या फावल्या‌वेळेत ते तिलारीला गेले होते व सायंकाळी पुन्हा ते कामावर हजर होणार होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. त्यांच्या घरातील कर्त्या व्यक्तीचेच अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.