
सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर येथे 27 ऑक्टोबर रोजी शिव संस्कार व शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आरमार दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रास्त्रे, गडकिल्ले छायाचित्र, शिवकालीन नाणी,मोडी लिपीतील कागदपत्रे पहावयास मिळणार आहेत.
प्रदर्शन सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये होणार आहे त्यानंतर पाच ते सहा या वेळेत मराठा आरमार दिन या विषयावर व्याख्याते पंकज भोसले यांचे व्याख्यान होणार आहे अशी माहिती शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष गणेश ठाकूर यांनी दिली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमक शत्रूंविरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि सर्वसामान्य जनतेला स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी जागृत केले. यवनी सत्तेविरुद्ध लढून दुर्गदुर्गेश्वर रायगडावर हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन स्थापन केले ही एक अलौकिक आणि अद्भुत घटना होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जाज्वल्य इतिहासाच्या स्मृती जागवण्यासाठी मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिवसंस्कारतर्फे शिवशंभू विचार दर्शन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवरायांनी उत्तम प्रकारे दुर्ग व्यवस्थापन करत आपला स्वराज्य विस्तार केला. साल्हेर,अहिवंत पासून ते जिंजी पर्यंतचा प्रदेश नवीन दुर्ग उभारून व काबीज करून स्वराज्याला जोडला. या प्रदर्शनात याच किल्ल्यांची ओळख छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्याभिषेका वेळी शिवरायांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन सुरू करत सोन्याची व तांब्याची नाणी निर्माण केली. त्या काळातील प्रचलित शिवराई नाणी प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. तसेच शिवरायांच्या इतिहासाची अस्सल साधने म्हणून ओळखली जाणारी मोडी लिपीतील कागदपत्रे व त्यांनी वापरलेले शिक्के ठसे यांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत. महाराजांना शस्त्र शास्त्र पारंगत म्हटले जाते कारण त्यांना शस्त्रांची उत्तम पारख होती. त्याकाळी वापरण्यात येणाऱ्या मराठा तलवारी, भाले, ढाल, पट्टा,खंजीर,कट्यार ही शस्त्रे व त्यांची माहिती प्रदर्शनात अभ्यासता येणार आहे.
तरी समस्त नागरिकांनी व शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा व व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्षा डॉ. सोनल लेले यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी ऍड सोनू गवस, नितीन नाईक, मंदार गावडे, अभिजीत राऊळ, कृष्णा करमळकर व संदेश देसाई उपस्थित होते.