
पालकमंत्री नितेश राणेंचे मानले ग्रामस्थांनी आभार
सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरे गावातील ग्रामस्थांनी ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे, गावातील सरकारी अधिकृत रस्ता अखेर अतिक्रमणमुक्त झाला. हा ऐतिहासिक विजय धाकोरे आणि बांदिवडेवाडी येथील ग्रामस्थांच्या एकजुटीचा प्रतीक बनला असून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली.
गेल्या ३५ वर्षांपासून धाकोरे गावातील 'होळीचे भाटले' पासून 'बांदिवडेवाडी' पर्यंत जाणारा महत्त्वाचा सार्वजनिक रस्ता काही व्यक्तींच्या अतिक्रमणामुळे पूर्णपणे बंद झाला होता. यामुळे अनेक कुटुंबांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी केल्या, उपोषण केली. परंतु, हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता. मात्र, ग्रामस्थांनी आपला लढा सोडला नाही.
अखेरीस, त्यांनी हा प्रश्न पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मांडला. त्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत, तात्काळ प्रशासनाला यावर ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले. यामुळे या प्रक्रियेला गती मिळाली. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली. प्रशासनाने जेसीबीच्या मदतीने अतिक्रमणे हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा केला. यावेळी तहसीलदार, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, आणि मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू साटेलकर यांनी मोठी मेहनत घेतली होती. अनेक वेळा त्यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच उपोषणाचे हत्यार देखील उपसले होते. अखेर त्यांनी १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत याबाबत निवेदन सादर करीत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
प्रशासनाने कार्यवाही करत अखेर हा रस्ता वाहतुकीस मोकळा केला. हा क्षण धाकोरेवासियांसाठी एक मोठा आनंदाचा क्षण ठरला असून रस्ता मोकळा झाल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे आभार मानले. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांचेही विशेष आभार मानले. आता रस्ता मोकळा झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा रस्ता लवकरच डांबरीकरण होऊन पक्का होईल, अशी त्यांना खात्री आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला.