
रत्नागिरी : गणेश उत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात येणार आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, त्यांना कोणताही रस्त्यांचा त्रास होऊ नये, याबाबत खबरदारी घ्या. रस्त्यांची दुरुस्ती करा, पर्यायी रस्त्यांचे फलक लावा, पेवर ब्लॉकची कामे व्यवस्थित झाली पाहिजेत. ही सर्व कामे तातडीने करावीत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाची याची काल पहाणी करुन, शासकीय विश्रामगृहात आज राष्ट्रीय महामार्ग 66 संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, माजी आमदार राजन साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले, गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवास्यांना खराब रस्त्यांची, वाहतूक कोंडीबाबत कोणतीही अडचण येता कामा नये. रस्त्यांवरील खड्डे मुजवावेत. चिखल हटवून तातडीने दुरुस्ती करावी. ज्या ठिकाणी लाईटची मागणी आहे, तिथे हायमॅक्स लावून द्या. काही ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्याचे काम सुरु आहे, ते व्यवस्थित बसले पाहिजेत. त्याचा वाहतुकीसाठी कोणताच त्रास होता कामा नये. घाटाच्या ठिकाणी मातीची धूप रोखण्यासाठी वृक्षारोपण करा. प्रवास्यांसाठी सुविधा केंद्र, रुग्णवाहिका, याबरोबरच पर्यायी रस्ता याबाबतचे फलक, पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग या सर्वांनी लावून प्रवाशांना सुविधा द्याव्यात.
मंडणगड येथील न्यायालय बांधकाम इमारतीबाबतही त्यांना यावेळी आढावा घेतला. उपप्रादेशिक परिवहन विभागाने संगणकीय सादरीकरण करत रस्त्यांबाबत उपाययोजनांविषयी माहिती दिली.