वेताळ बांबर्डे येथील महामार्गाच्या दुरुस्तीला वेग

'कोकणसाद LIVE'चा IMPACT ; ठेकेदार अखेर कामावर हजर
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 14, 2026 14:35 PM
views 82  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामांमुळे वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाचे वृत्त 'कोकण साद लाईव्ह' वर प्रसिद्ध होताच, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराला अखेर खडबडून जाग आली आहे. या वृत्ताची गंभीर दखल घेत, वेताळ बांबर्डे परिसरातील जीवघेण्या ठरणाऱ्या पॅचच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

वेताळ बांबर्डे  महामार्गाचा काही भाग प्रचंड खराब झाला होता. हा रस्ता उंच-सखल झाल्यामुळे वेगाने येणाऱ्या गाड्यांना जोरदार हादरे बसत होते. यामुळे अनेक वाहनचालकांचा गाडीवरील ताबा सुटून बॅलन्स बिघडत होता. दुचाकीस्वारांसाठी तर ही स्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. या गंभीर समस्येकडे 'कोकण साद लाईव्ह'ने लक्ष वेधून प्रशासनाला जाब विचारला होता.

बातमीचा परिणाम म्हणून कालपासून वेताळ बांबर्डे पुलाजवळील काम सुरू करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच खराब झालेल्या पॅचच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराचे कामगार सर्व यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 यासंदर्भात संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता, त्यांनी आजच या पॅचची दुरुस्ती पूर्ण करून रस्ता प्रवासासाठी सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले आहे.

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत होते. मात्र, कोकण साद ने हा विषय लावून धरताच अवघ्या २४ तासांत यंत्रणा कामाला लागली आहे. 'कोकण साद लाईव्ह'ने दिलेल्या या वृत्तामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.