भाजप नेते महेश सारंग यांचा महावितरणला हायव्होल्टेज शॉक | अवघ्या ४ तासात बदलेला पर्मनंट वायरमन दिला परत

Edited by: विनायक गावस
Published on: July 26, 2023 17:56 PM
views 225  views

सावंतवाडी : कारीवडे गावात कार्यरत असलेल्या पर्मनंट वायरमनना कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता परस्पर बदलण्यात आल्याने कारीवडे ग्रामस्थ आक्रमक झाले. दोन कंत्राटी कामगारांच्या जीवावर गाव टाकल्यान काळोखात राहण्याची वेळ येत होती. तर दिलेल्या कामगारांना पोलवर चढता येत नसल्याने पोलवर चढायचं कुणी ? हा प्रश्न निर्माण झाला होता. विद्युत वितरण कंपनीच्या या कारभारामुळे आज कारीवडे ग्रामस्थांनी आक्रोश आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक व भाजपचे नेते महेश सारंग यांनी रौद्ररूप धारण करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर अधिकाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत हा वायरमन कारिवडेत हजर होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

‌कारीवडे गावात पर्मनंट वायरमन गेले सहा महिने काम करत होता. त्यावेळी गावात कोणत्याही ग्राहकांची तक्रार नव्हती. मात्र, ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परस्पर वायरमनला माजगाव येथे हलविले व दोन कंत्राटी कामगारांच्या हातात मोठ्या गावातील वाड्या दिल्या. त्यामुळे अनेक वेळा या गावाला काळोखाला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत विद्युत वितरण कंपनीला लेखी पत्र देऊनही त्यावर कोणतीही उपयोजना केली नाही. म्हणून आज कारीवडे ग्रामस्थांनी भाजपा नेते महेश सारंग ,भाजप तालुका उपाध्यक्ष अशोक माळकर, सरपंच सौ माळकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन केले.

यावेळी महेश सारंग यांनी उप कार्यकारी अधिकारी कुमार चव्हाण यांना धारेवर धरत वायरमनची बदली कोणत्या नियमा खाली केली ? बदलीबाबत कोणती प्रोसिजर आहे अशी विचारणा करून धारेवर धरले. त्यावेळी चव्हाण यांनी दुपारपर्यंत आपला वायरमन आपल्याला परत देऊ असे आश्वासन दिले. गावातील जीर्ण पोल बदलण्याचे तसेच विद्युत वाहिनीवर आलेली झाडे तोडण्याचे काम ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन लवकरच केले जाईल असा विश्वास चव्हाण यांनी उपस्थितांना दिला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुस्कर, आनंद तळवणेकर, माजी सरपंच बंटी आमोणकर, लवू पार्सेकर या़सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.