...इथं टेकला जातो माथा...!

सद्गुरू मियांसाब यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात
Edited by:
Published on: June 14, 2023 15:29 PM
views 222  views

सावंतवाडी : सर्व धर्मांचा अंतिम हेतू 'परमेश्वर' ही शिकवण देणाऱ्या सद्गुरू मियांसाब यांचा ७८ वा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या परमपूज्य श्री सदगुरू मियांसाब यांचा मुंबई - गोवा महामार्गावर असलेल्या कोलगाव येथील या समाधीस्थळी सावंतवाडीसह जिल्हाभरातील भक्तगणांनी नतमस्तक होत चादर अर्पण केली.

संतांची भूमी असणाऱ्या कोकणातील सद्गुरू मियासाब हे सर्व जाती धर्माच्या पलीकडे जावून धर्मातील अध्यात्माच्या प्रगतीपथावर पावूल टाकणारे सदगुरू आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू - मुस्लीम एकतेचे प्रतिक मानले जाते. पूर्वीचें सावंतवाडी संस्थान अर्थात बांदा येथिल रहिवासी मुसलमानी धर्म पंथांतील 'सद्गुरु' घराणे होते. या घराण्यात हे महासंत उदयास आले. मुसलमान धर्माचे संस्थापक महंमद यांचे नाव त्यांना  ठेवण्यात आले. बांधकाम विभागात अधिकारी असणाऱ्या मियांसाब यांच शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी स्थळ बांधकामात मोठं योगदान होत. 'महंमद अबदुल्ला सद्गुरु' अर्थात सद्गुरू मियासाब यांचा योगी एकादशी दिवशी पुण्यातिथी सोहळा साजरा केला जातो. सिताराम महाराज यांचे ते शिष्य असून सावंतवाडी व कोलगाव येथील स्थानिकांचा व व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठा वाटा असतो. मियासाब यांच्या समाधीवर चादर चढवून नवस फेडले जातात.

यावर्षी ७८ व्या पुण्यतिथीला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळपासूनच सद्गुरू पूजन, नामस्मरण, किर्तन, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत वाचन हरिपाठ, आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाप्रसाद पार पडला. जिल्ह्यासह गोवा कर्नाटक येथील भाविक देखिल पुण्यतिथी निमित्त समाधीवर चादर अर्पण करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी वसंत राणे, सतिश शिरोडकर, दत्तप्रसाद अरविंदेकर, शैलैश पई, उमेश कोरगावकर, दिलीप गिरप, बंटी माठेकर यांसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.