
मालवण : आचरा पंचक्रोशी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून सुरु केलेल्या 'सहकार्यातून सेवा' या उपक्रमांतर्गत रामगड विद्या मंदिर रामगड या प्रशालेची होतकरू हुशार विध्यार्थिनी कु. चिन्मयी शिंदे हिचा विशेष सत्कार करत तिला मंडळाकडून पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. या वर्षी दहावी मध्ये 96% गुण मिळवत तिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यावेळी श्री. मुन्ना बांदिवडेकर, श्री उमेश साटम, श्री. वैभव सावंत, कु. तेजस घाडीगावकर आणि कु. जयदीप कुबल, सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
आचरा पंचक्रोशी क्रिकेट क्लब या मंडळाकडून एक संकल्पित उपक्रम बांदिवडे येथील श्रीराम उर्फ मुन्ना बांदिवडेकर यांच्या संकल्पने मधून राबविला जात आहे. या ग्रुप मधील सदस्य महिना पन्नास रुपये आणि त्यापेक्षा शक्य असेल अशी रक्कम जमा करतात. पंचक्रोशी मध्ये हुशार, होतकरू पण आर्थिक दृष्टीने कुठे तरी कमी अश्या मुलांची माहिती घेऊन जमा झालेल्या निधीमधून रोख रुपये 5000/- एवढी मदत केली जाते.
यापूर्वी त्रिंबक गावामधून जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या कु. प्रतिक्षा विश्वास परब, तसेच आचरा पिरावाडीच्या श्री रामेश्वर विद्या मंदिर या प्रशाले मधील अपंग विद्यार्थी कु. ओमकार सुनील पेडणेकर याला आर्थिक मदत केल्याची माहिती बांदिवडेकर यांनी दिली. एकजुट अजून घट्ट करून सर्व सदस्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम यापुढेही चालू ठेवण्यात येईल असे श्रीराम बांदिवडेकर यांनी सांगितले.