घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिवाळी साहित्य विक्रीतून पूरग्रस्तांना पाठवली मदत

स्काऊट-गाईड उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Edited by:
Published on: October 18, 2025 19:09 PM
views 13  views

बांदा : जिल्हा परिषद घारपी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीचा आनंद समाजकारणाशी जोडत एक अनोखी पहल केली आहे. शाळेच्या परिसरात स्वनिर्मित दिवाळी साहित्याचा बाजार भरवून त्यातून झालेल्या नफ्याची रक्कम मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना पाठवून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

“लगबग दिवाळी” या उपक्रमांतर्गत शाळेतील स्काऊट-गाईड आणि कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी मातीच्या पणत्या रंगवणे, कागदी लहान-मोठे आकाशकंदील, सुगंधी उटणे, वाॅलपिश, पतंग अशा विविध साहित्याची स्वनिर्मिती केली. या बनवलेल्या वस्तूंचा “दिवाळी धमाका बाजार” शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता.

या बाजारात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या साहित्यासोबतच रांगोळी पीठ, साचे, साबण, तेल अशा विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने बाजाराला भेट देऊन विद्यार्थ्यांची साहित्य खरेदी केली आणि त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. या उपक्रमातून १०२५ रुपये नफा झाला असून, ही संपूर्ण रक्कम यावर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठविण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर शुभेच्छा कार्ड तयार करून ती अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवरांना पोस्टाने पाठवली. तसेच विद्यार्थ्यांसाठी लाडू, चकली, शंकरपाळी, चिवडा अशा पारंपरिक पदार्थांची “फराळ पार्टी”ही आयोजित करण्यात आली होती.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांच्यासह शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्षा यशोदा गावडे, सदस्य, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. शाळेच्या या सामाजिक उपक्रमाचे केंद्रप्रमुख आर. बी. गावडे, विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर, गटशिक्षणाधिकारी सविता परब तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.