वायरी तारकर्ली ते गावकरवाडा रस्ता पाण्याखाली

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 16, 2024 10:47 AM
views 217  views

मालवण : मालवण नगरपरिषदेने  लाखो रुपये खर्च करून तयार केलेला वायरी तारकर्ली रस्ता ते गावकरवाडा जोडरस्ता हा पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला आहे. या रस्त्याची अजून किमान तीन फुट उंची वाढविणे गरजेचे आहे. रस्त्याची उंची न वाढल्यास लाखो रुपये पाण्यात जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

मालवण नगरपरिषद हद्दीतील वायरी तारकर्ली रस्ता ते गावकरवाडा जोडरस्ता मंजूर होऊन गेल्यावर्षी काम सुरु झाले. मातीचा भराव टाकून हे काम करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी सकल भाग असल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तेथून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. या रस्त्याची उंची वाढविणे गरजेचे आहे. तेथील पाणी पाहता अजून 3 फुट रस्त्याची उंची वाढविणे गरजेचे आहे. रस्त्याच्या पुढील कामाचा टप्पा हा खडीकरण, डांबरीकरणाचा आहे. आहे त्या रस्त्यावर डांबरीकरण केल्यास सर्व निधी पाण्यात जाणार आहे. 

'जोडरस्ता' जोडलाच नाही !

या रस्त्याचे नाव जोड रस्ता असला तरी हा रस्ता गावकरवाडा येथे अजून जोडलाच नाही. हा तेवढाच भाग का ठेवण्यात आला ? असा सवाल नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता करून त्या रस्त्याची तीन फुट उंची वाढविणे. त्यानंतरच खडीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.