वैभववाडीत मुसळधार ; भुईबावडा घाटात पडझड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 27, 2023 18:42 PM
views 101  views

वैभववाडी : तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने दाणादान उडवली.  सर्व नद्यांना पूर आला. कुसुर, दिगशी, तिरवडे तर्फे खारेपाटण, उंबर्डे या भागात रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. पावसामुळे भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या हटवून मार्ग सुरळीत सुरू केला.


   तालुक्यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.मागील तीन दिवसांत २८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज पहाटे पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सर्व नद्यांना पूर आला होता. या पुरामुळे कुसुर सुतारवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे कुसुर भुईबावडा वाहतूक ठप्प झाली होती. उंबर्डे -तिथवली मार्गावरील कातकरवाडी व दिगशी येथे पाणी आले होते. त्यामुळे या मार्गाची वाहतूक काही काळ बंद होती. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.


भुईबावडा घाटात पडझड

संततधार पावसामुळे भुईबावडा घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साह्याने ह्या दरडी हटवून मार्ग सुरळीत केला. कोल्हापुर मार्ग बंद असल्याने सध्या घाटात वाहतूक कमी आहे. यामुळे दरड पडल्याचा फारसा परिणाम वाहतूकीवर झाला नव्हता.

 

अतिवृष्टीमुळे घर, गोठे यांची पडझड

तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घर,गोठे, संरक्षण भिंती कोसळून १लाख ७२हजार ५००रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोकीसरे येथील संतोष सहदेव पवार संरक्षण भिंत ८०हजार,नाधवडे येथील अशोक वासुदेव गिते (गोठा )१२हजार, आचिर्णे घाणेगड मधील जयवंत रावराणे घर ७०हजार, उंबर्डे मेहबूबनगर यासीन महमद जेठी संरक्षण भिंत ६ हजार, अदम अब्बास पाटणकर (घर)४ हजार ५००रुपये असं मिळून या अतिवृष्टीमुळे एक लाख बहात्तर हजार पाचशे रुपयांचे विविध मालमत्तेंचे नुकसान झाले आहे.