
सावंतवाडी : मान्सुनपूर्व अवकाळी पावसानं सावंतवाडी शहरासह तालुक्याला झोडपून काढलं. वादळी वारा, गडगडाटासह पावसानं थैमान घातलं. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं सर्वांची धांदल उडाली. वादळी वारा, गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसल्यानं विद्युत पुरवठा खंडीत झाला. अवकाळीमुळे आंबा, काजू शेतकरी, व्यापारी यांना फटका बसला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा, काजू उत्पादकांना बसला. काढणीला आलेल्या आंब्याचा दर्जा पावसामुळे घसरला असून अनेक ठिकाणी आंब्याचे पीक गळून पडले आहे. यामुळे बाजारपेठेतील आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. काजू पिकालाही या पावसाने झोडपले असून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेती पूर्वमशागतीची कामं पावसानं पूर्णपणे थांबवली आहेत. पेरणीपूर्व कामांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात घर शाकारणीची कामे तसेच पावसाळ्यासाठी आवश्यक बेगमीची कामे अपूर्ण राहिलीत. गुरांसाठी साठवलेले गवत भिजल्याने पशुपालकांचेही नुकसान झाले आहे. अचानक पावसाने जोर धरल्याने रस्त्याची तसेच बांधकाम क्षेत्रातील कामे रखडलीत.
पावसामुळे कामांमध्ये व्यत्यय येत असल्याने नियोजित वेळेत कामे पूर्ण करणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात लाकूडफाटा भिजल्याने चुली पेटवणेही कठीण झाले आहे. लग्न आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही या पावसाने विघ्न निर्माण केले असून अनेकांना कार्यक्रम रद्द पुढे ढकलावे लागले आहेत. या पूर्वमोसमी पावसाने तालुक्यात सर्वच स्तरावर मोठे नुकसान केले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आणि बाधित घटकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.