
वैभववाडी : घाट क्षेत्रात सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाचा सर्वाधिक फटका करुळ गावाला बसला आहे. भातशेतीच मोठं नुकसान झालं. तर या पावसामुळे गावातील चार काॅजवे पुराच्या गाळाने भरले होते.त्यामुळे या काॅजवेवर पाणी असल्याने चार वाड्याचा संपर्क तुटला होता. जेसीबीच्या साह्याने काॅजवेतील गाळ उपसण्याचे काम दिवसभर सुरू होते.
सोमवारी सायंकाळी सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठा पाऊस झाला. या पावसाने करूळ घाटात ठीक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तसेच घाटातील चिखल माती दिंडवणेवाडी व भट्टीवाडी व्हाळातून वाहून आल्याने चार काॅजवे भरून गेले होते. पाणी रस्त्यावरून वाहत होते.
करूळ दिंडवणेवाडी, भट्टीवाडी, खडकवाडी व गावठाण ब येथील काॅजवे पाण्याखाली गेले. चारही वाड्यांचा संपर्क मंगळवारी दिवसभर तुटला होता. तसेच भात व नाचणी शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.