
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकी करिता प्रारूप मतदार यादीवर असलेल्या सूचना व हरकती वरील सुनावणी घेतल्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कणकवलीतील प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या तब्बल 1020 सूचना व हरकतींवर सुनावणी घेत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र कणकवली नगरपंचायत स्थापन झाल्यापासून बहुदा निवडणुकीच्या प्रारुप प्रभाग निहाय मतदार यादीवर आलेल्या या आतापर्यंतच्या सर्वात जास्त हरकती असल्याचे समजते.
या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेतल्यानंतर त्या मतदारांना नोटीसा बजावणी करून सुनावणी घेण्यात आली. परंतु या सुनावणी वेळी संबंधित मतदार हजर राहिले नाही. त्यांच्या बाबतीत काय निर्णय झाला ते मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तसेच आतापर्यंत प्राप्त झालेल्या किती सूचना व हरकती स्वीकारल्या गेल्या व किती फेटाळल्या या बाबतची माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. गेले तीन दिवस या प्रारूप प्रभाग निहाय मतदार यादीवर प्राप्त झालेल्या सूचना व हरकतीवर सुनावणी घेण्यात आली होती. कणकवली प्रांताधिकाऱ्यांसह कणकवली मुख्याधिकारी व अन्य काही अधिकारी देखील यासाठी काम करत होते. परंतु प्रारूप मतदार यादी तयार करताना मागील रेफरन्स न घेतल्याने हा हरकतींचा डोंगर तयार झाल्याचे समजते. दरम्यान या गोंधळामुळे मात्र मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या सर्व प्रशासनाला देखील गेले काही दिवस मनस्ताप सहन करावा लागल्याचे समजते. या सूचना व हरकती दरम्यान दुबार मतदारांबाबत देखील तक्रार दाखल झाली होती. मात्र याबाबतचा निर्णय अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या बाबत नेमकी प्रशासन काय भूमिका घेणार, जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत या दोन्ही भागांमध्ये मतदार यादीत एकच नाव असल्यास त्याबाबत मुख्याधिकारी किंवा तहसीलदार स्तरावरून कोणते आदेश दिले जाणार ते देखील या संपूर्ण प्रकरणी पाहणे महत्वाचे असणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार दुबार नाव आढळल्यास याबाबत संबंधित मतदारांना नोटीस देत दोन पैकी कोणत्याही एका ठिकाणी नाव ठेवावे अशी सूचना करण्यात येणार असल्याचे समजते. परंतु याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दुबार नावांबाबत केलेल्या आरोपांमुळे मतदार यादी बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाकडून याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची गरज आहे.










