आरोग्याचं लोकप्रतिनिधींना नाही सोयरसुतक

सरकारची फक्त आश्वासनं !
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2025 19:30 PM
views 190  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयात पूर्णवेळ फिजिशियन नाही. ऑनकॉल फिजीशीयन नियुक्त करण्यात आलेत. मात्र, आता 108 ॲम्बुलन्सवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक १०८ व उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून एकमेकांवर बोट दाखवण्याचे प्रकार होत असून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेंच काही सोयरसुतक राहीलय की नाही ? असा प्रश्न विचारला जात आहे. सरकारकडून केवळ आश्वासन दिली जात असून दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणा कोलमडत चालली आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी फिजिशियन द्यावा यासाठी अनेक आंदोलन, उपोषणे झाली. त्यानंतर ऑनकॉल फिजीशीयन नियुक्त करण्यात आले. मात्र, आता 108 रूग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नाहीत. अति गंभीर रुग्णांना याचा फटका बसत आहे. खाजगी रुग्णवाहिकेन गोवा-बांबोळी  गाठावी लागत आहे. रेफरल होणाऱ्यां रूग्णांची संख्या अधिक असल्याने डॉक्टर टिकत नसल्याचे १०८ प्रशासनाच म्हणणं आहे. तर गोवा बांबोळीला पाठविण्यात येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाल्याच उपजिल्हा रुग्णालय प्रशासन सांगत आहे. 

दरम्यान,  आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी अभाव आहे. यामुळे त्यांच्यावर ताण पडतो. असुविधांमुळे लोकांचे हाल होत असताना लोकप्रतिनिधी सुशेगाद आहेत अशी प्रतिक्रिया सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व राजू मसुरकर यांनी व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याप्रश्नी लक्ष घालून सुविधा देण्याचे मान्य केले असताना दिवसेंदिवस नविन समस्या समोर येत आहे. सरकार केवळ आश्वासन देत असल्यानं सामन्यांत नाराजी आहे. खासदार, आमदारांनी रुग्णांच काही सोयरसुतक नाही का ? असा सवाल जनता विचारत आहे.