आरोग्यमंत्री म्हणतात आरोग्य ठिकठाक..!

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा अजब दावा
Edited by: विनायक गावस
Published on: December 08, 2023 19:44 PM
views 321  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्याच्या गैरव्यवस्थेवरून मोठ्या प्रमाणात जनतेत संतापाची लाट असताना विधानपरिषदेत मात्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्ह्याच आरोग्य ठिकठाक असल्याचा दावा केला आहे. हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सदस्यांकडून कोकणच्या आरोग्यप्रश्नी अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी शासकीय रूग्णालयांत दाखल होणाऱ्या सर्व रूग्णांना कार्यरत वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत सर्व आवश्यक वैद्यकिय सुविधा पुरविण्यात येत असल्याने ''रूग्ण आरोग्य सेवांपासून वंचित राहत नाहीत'' असं उत्तर आरोग्यमंत्री यांनी दिलं आहे. 

 विधानपरिषदेत हा अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सिंधुदुर्गसह कोकणातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे विधानपरिषदेचे आ.कपिल पाटील, आ. सुनिल शिंदे, आ. विलास पोतनीस यांनी लक्ष वेधलं. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तसेच अन्य नागरिकांना सर्पदंशावरील उपचार वेळेवर न मिळाल्याने त्यांचे मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे खरे आहे का ? असा सवाल त्यांनी केला. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, रुग्णालयीन सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने रुग्णालय हे २४ तास सुरू असतात. सर्पदंश, श्वानदंश व इतर विषबाधा होणे हे गंभीर स्वरूपाचे आजार असल्याने रुग्णांवर तातडीने उपचार केले जावेत याकरीता सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपस्थित वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी विशेषज्ञ यांचेमार्फत विशेष दक्षता

घेण्यात येते व रूग्णांवर तातडीने उपचार केले जातात. तसेच आयुक्तालयाने २५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्पदंश या विषयाबाबत सर्व संस्थांना मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सर्व जिल्हास्तरीय अधिकारी व सर्व आरोग्य संस्थाप्रमुख यांना सर्पदंश या विषयावर तज्ञांमार्फत प्रशिक्षित करण्यात आले आहेत. 

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात सर्पदंशाचे उपचार व्हावेत यासाठी गाव विकास समिती, रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे का ? असा सवाल केला असता रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात सर्पदंशाचे उपचार व्हावेत यासाठी गाव विकास समिती, रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेले निवेदन स्थानिक स्तरावर प्राप्त झालेले नाही असे सांगण्यात आले. तर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीगृह सुस्थितीत नसणे, डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अनेक महिलांचे मृत्यू झाले आहेत याबाबत विचारले असता, मंत्री यांनी हे खरे नाही. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये सर्व सोयींनी युक्त सुस्थितीतील प्रसुतीगृहे उपलब्ध आहेत. तसेच रूग्णालयांत दाखल होणाऱ्या सर्व रूग्णांना कार्यरत वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत सर्व आवश्यक वैद्यकिय सुविधा पुरविण्यात येत असल्याने रूग्ण आरोग्य सेवांपासून वंचित रहात नाहीत अस सांगितलं आहे. याप्रसंगी नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा, महिलांसाठी सुस्थितीतील प्रसुतीगृह उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच ग्रामीण भागात सर्पदंश झालेल्या व्यक्तींना वैद्यकीय उपचार मिळण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ? नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत असा सवाल केला. याच्या उत्तरात आरोग्य मंत्र्यांकडून रूग्णालयीन सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने सर्व शासकीय रूग्णालयेही २४ तास सुरू असतात. सर्पदंश, श्वानदंश व इतर विषबाधा होणे हे गंभीर स्वरूपाचे आजार असल्याने रूग्णांवर तातडीने उपचार केले जावेत याकरीता सर्व आरोग्य संस्थांमध्ये विशेष दक्षता घेण्यात येते. तर विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.

एकंदरीत, कोकणासह विशेषतः तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजलेले असताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत वस्तूस्थिती मान्य करत त्यावर तोडगा काढण्या ऐवजी विषयाला बगल देताना दिसून आलेत. सर्पदंशासह इतर गंभीर आजारांवर न होणाऱ्या उपचाराअभावी तळकोकणात लोकांचे जीव जात आहेत. उपचार मिळत नाहीत म्हणून गोवा बांबोळी, कर्नाटक, मुंबईला धाव घ्यावी लागत आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयासह सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनकडून प्रसुतीतज्ञ नसल्याच सांगितल गेलं. ५० टक्के पद रिक्त असल्यानं आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचं सरळ सरळ उघड झालय. वैद्यकीय अधिकारी, शल्य चिकित्सकांकडून वारंवार पाठपुरावा करूनही पद रिक्तच आहेत. त्यात तळकोकणातील गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जन्मभूमी सोडून इतरत्र जावं लागतं असताना, खाजगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. कधीकधी तर १०८ मध्येच प्रसुती झाल्याची घटना सिंधुदुर्गत घडली आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने माता, नवजात बालकांचा मृत्यूही झाल्याच्या घटना इथं घडल्या आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या परिस्थितीची गंभीरता ओळखून स्वतः याचा आढावा घेत संबंधितांना खडसावत रिक्तपद तातडीनं कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी आदेश दिले आहेत. जे होतं नाही ते सांगण्यापेक्षा जे होतं आहे ते करा असा आदेश पालकमंत्र्यांनी दिला असताना आरोग्यमंत्री शासकीय रूग्णालयांमध्ये सर्व सोयींनी युक्त सुस्थितीतील प्रसुतीगृहे उपलब्ध आहेत, सर्व काही सुरळीत आहे हा दावा नेमका कशाचा जोरावर करत आहेत ? आरोग्य यंत्रणा मृत्यू शय्येवर असताना मंत्री महोदय व्हेंटिलेटरवर अजून किती दिवस बाजू मारून नेणार आहेत ? हा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या अतारांकित प्रश्नांवर आरोग्यमंत्री तारे तोडून कोकणवासियांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याच काम करत आहेत का ? हा 'तारेतोड प्रश्न' आता कोकणवासियांना पडला आहे.